निम्मा जिल्हा चौपदरीकरणासाठी रायगडकडे
By admin | Published: October 19, 2015 11:21 PM2015-10-19T23:21:57+5:302015-10-19T23:47:44+5:30
मुंबई-गोवा महामार्ग : उंटावरून शेळ्या हाकण्याच्या प्रकाराने संताप
प्रकाश वराडकर --रत्नागिरी--मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची नव्याने विभागणी करताना निम्मा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्ह्याच्या स्वाधीन करण्यात आला आहे. खेड, चिपळूण आणि संगमेश्वर हे तीन तालुके चौपदरीकरणाच्या देखरेखीसाठी रायगड जिल्ह्याकडे देण्यात आल्याने येथील कामावर महाड व पेण विभागाचे अधिकारी देखरेख करणार आहेत. उंटावरून शेळ्या हाकण्याच्या या प्रकारामुळे या कामाच्या दर्जावर नियंत्रण राहील का आणि भविष्यात रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पेण विभागाकडेच जावे लागेल का, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.
राज्याच्या मंत्रालय पातळीवर हा निर्णय घेण्यात आला असून, १ आॅक्टोबरला तसा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. चौपदरीकरणासाठी रत्नागिरी जिल्ह्यात सर्वांत आधी जमीन मोजणीचे काम पूर्ण झाले होते. चौपदरीकरणासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याच्या प्रत्येक उपविभागाकडे दोन तालुके देखरेखीसाठी देण्याचा निर्णय केंद्रीय पातळीवर घेण्यात आला होता. प्रत्येक जिल्ह्यातील चौपदरीकरणाचे काम हे त्याच जिल्ह्यातील महामार्ग विभागाच्या देखरेखीखाली व्हावे, असेही ठरविण्यात आले होते. मात्र, त्यात काही
अधिकाऱ्यांनी राज्यपातळीवर ढवळाढवळ केल्याची चर्चा असून, त्यांचा यामागील हेतू काय, असा प्रश्न विचारला जात आहे. या संपूर्ण प्रकारामागे नेमके कोण आहेत, याचीही चर्चा सुरू झाली आहे.
आधीच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या नियोजनानुसार चौपदरीकरणाच्या कामावर देखरेख व्यवस्था याप्रमाणे होती : चिपळूण उपविभाग (१६१-०० ते २४१-०० किलोमीटर) खेड व चिपळूण तालुका. एकूण अंतर ८१ किलोमीटर. रत्नागिरी उपविभाग : (२४१.०० ते ३०५.५०० किलोमीटर) संगमेश्वर व रत्नागिरी तालुका. एकूण अंतर ६४.५०० किलोमीटर. खारेपाटण उपविभाग : (३०५.५०० ते ३६७.३०० किलोमीटर) कार्यक्षेत्र लांजा व राजापूर तालुका. एकूण अंतर ६१.८० किलोमीटर. सावंतवाडी उपविभाग : (३६७.३० ते ४७५.२१० किलोमीटर). कार्यक्षेत्र-कणकवली, कुडाळ व सावंतवाडी तालुका. आता जिल्ह्यातील खेड, चिपळूण व संगमेश्वर तालुक्यांचे चौपदरीकरण काम चिपळूण उपविभागासह रायगड जिल्ह्यास जोडले गेले आहे.
हातचलाखीचा विषय केंद्रापर्यंत
मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांच्या सुरात सूर मिसळून चौपदरीकरणाबाबत करण्यात आलेली ही ‘हातचलाखी’ लक्षात आल्याने व जिल्ह्यावर अन्याय होऊ नये म्हणून जिल्ह्यातीलच एका मोठ्या नेत्याने हा वादग्रस्त विषय केंद्राकडे पोहोचविला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागालाही याबाबत विश्वासात घेतले गेलेले नाही तसेच झालेली कामाची विभागणी ही अयोग्य असून पूर्वीसारखेच नियोजन न ठेवल्यास चौपदरीकरणाच्या कामात अडथळे निर्माण होतील, असा इशारा या नेत्याने संबंधितांना दिला आहे.
विभागणी अडचणीचीच...
चौपदरीकरणाच्या नवीन आदेशानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील बावनदीपर्यंतच्या कामाची जबाबदारी ही महाड व पेण रस्ते विभागाकडे सोपविण्यात आली आहे. हे काम झाले तरी पुढे दुरुस्तीचा विषय येईल तेव्हाही संगमेश्वरच्या लोकांना रत्नागिरी विभागाकडे तक्रार देता येणार नाही तर ती पेण विभागाकडे द्यावी लागणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाशी चर्चा न करता घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे चौपदरीकरणात अनेक अडचणी निर्माण होण्याचीच भीती आहे.