रेल्वे प्रशासनाचे कोकणकडे दुर्लक्षच
By Admin | Published: September 11, 2016 09:42 PM2016-09-11T21:42:35+5:302016-09-11T21:55:42+5:30
मूलभूत सुविधांची वानवा : दादर-रत्नागिरी, दिवा-सावंतवाडी पॅसेंजरची स्थिती दयनीय
कणकवली : कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना वरदान ठरलेली कोकण रेल्वे सतत या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असते. त्यामुळे कोकण रेल्वेची गाडी नक्की कधी रुळावर येईल हे मात्र आता मंत्री सुरेश प्रभूच सांगू शकतील. कारण कोकणात कोकण रेल्वेचे इंजिन कधीच सुसाट धावले नाही.
एस. टी. महामंडळ आणि खासगी बसच्या भरमसाट भाडेवाढीमुळे मेटाकुटीस आलेल्या कोकणवासीयांनी कोकण रेल्वेचा आसरा घेतला. कारण कोकण रेल्वेने कमी खर्चात गावी पोहोचणे सोयीस्कर झाले. मात्र, त्यांचा प्रवास खरंच सुखकर होतो की नाही हे बघणे आणि त्यांच्या सुरक्षिततेबरोबर सुविधांकडे लक्ष देणे याकडे कोकण रेल्वे प्रशासनाने नेहमीच दुर्लक्ष केले आहे.
काही ठरावीक जलद गाड्या सोडल्यास बाकी गाड्या रामभरोसे धावत आहेत. दादरवरून सुटणारी दादर-रत्नागिरी आणि दिव्यावरून सुटणारी दिवा-सावंतवाडी या दोन पॅसेंजर धिम्या गतीने धावणाऱ्या गाड्या खऱ्या अर्थाने कोकणवासीयांना फायदेशीर ठरत आहेत. या दोन गाड्यांनी कमी खर्चात कोकणवासीयांना आपल्या गावी जाता येते. त्यामुळे या दोन गाड्यांना नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. मात्र, गंजलेल्या गाड्या आणि तुटलेल्या खिडक्या, दारे, पावसाळ्यातून छतावरून टपकणारे पाणी, तुटलेल्या सीट यामुळे प्रवास करणे तसेच नादुरुस्त पंखे, बाथरुममधील तुटलेल्या काचा, तुटलेल्या खिडक्या त्यामुळे महिला प्रवाशांना शौचालयास जाणे अवघड होत आहे.
कित्येकवेळा गाड्यांमध्ये पाण्याची व्यवस्था नसणे, आपत्कालीन वैद्यकीय सेवेची वानवा, कचऱ्याच्या साम्राज्याबरोबर गर्दीच्या वेळेस फेरीवाल्यांचा सतत धुडगूस तर प्रवाशांना संरक्षणार्थ असणाऱ्या पोलिसांची कमतरता, काही ठिकाणी नावापुरते प्लॅटफॉर्म आहेत. मात्र, त्यावर छप्पर नसल्याने प्रवाशांना गाड्यांची वाट बघत ऊन आणि पावसाचा मारा सहन करावा लागतो. योग्य नियोजन नसल्याने या मार्गावर गाड्या कधीच नियोजित वेळेत धावत नाहीत.
गणेशोत्सव, होळी आणि एप्रिल ते मे महिन्यादरम्यान या गाडीने कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. त्या दरम्यान जादा गाड्या सोडूनही कमी पडतात. त्यामुळे बहुतेक प्रवासी बसायला जागा मिळावी म्हणून गावावरून येणारी सावंतवाडी-दिवा गाडी पनवेल स्टेशनवरच पकडतात. ती गाडी दिव्याला आल्यानंतर रात्री पनवेलला कारशेडला जाते. त्याच गाडीत बसून प्रवासी पुन्हा पनवेलला जातात. (प्रतिनिधी)
जादा गाड्या सोडण्याची मागणी
सकाळी ६.३० वाजता ती गाडी दिवा-सावंतवाडी म्हणून सुटते. प्रवाशांना मानसिक, शारीरिक आणि आर्थिक मनस्ताप होतो हे यावरून लक्षात येईल. कोकणसाठी जादा गाड्या सोडाव्यात, अशी कोकणवासीयांची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू कशी पूर्ण करतात याकडे कोकणवासीयांचे लक्ष राहिले आहे.