रेल्वेच्या प्रवाशांनीही घेतला धसका
By admin | Published: August 7, 2016 12:33 AM2016-08-07T00:33:39+5:302016-08-07T01:02:20+5:30
गाड्या रिकाम्याच : प्रवासी संख्या रोडावली, आरक्षण कक्षांमध्येही शुकशुकाट
रत्नागिरी : महाडमध्ये पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेत झालेली जीवितहानी व पावसाच्या कोसळधारा या पार्श्वभूमीवर एस. टी. व अन्य खासगी वाहनांद्वारे होणारी प्रवासी वाहतूक रोडावली आहे. कोकण रेल्वेकडे हे प्रवासी वळतील अशी शक्यता होती. मात्र, मुंबई ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या कोकण रेल्वेच्या गाड्यांकडेही प्रवाशांनी पाठ फिरवली असून, अनेक रेल्वे स्थानकांवर शुकशुकाट दिसून येत आहे. महाडमधील दुर्घटनेची दहशत अद्यापही जनमनावर दिसून येत आहे.
मुसळधार पाऊस, तुफानी वारे व महाडची दुर्घटना या सर्वच पार्श्वभूमीवर प्रवासाला बाहेर पडण्यापेक्षा घरीच थांबणे अनेकांनी पसंत केले आहे. महाड-पोलादपूर मार्गावरील ब्रिटिशकालीन पूल मंगळवारी रात्री कोसळून त्यावरून सावित्री नदीत दोन एस. टी.बस व तवेरासह अन्य वाहने कोसळली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. मृतदेह शोधण्याचे कार्य अद्यापही सुरूच आहे. ४०पेक्षा अधिक लोक बेपत्ता असून, त्यातील २१ मृतदेह किनाऱ्यांवर, खाड्यांमधून सापडले आहेत.
या थरकाप उडविणाऱ्या दुर्घटनेमुळे सारेच धास्तावले आहेत. त्यामुळे मुंबईला जाणाऱ्यांचे प्रमाण खूपच रोडावले आहे. रत्नागिरीतून सुटणारी रत्नागिरी-दादर पॅसेंजर ही रेल्वेगाडी नेहमीच प्रवाशांनी भरून वाहते. मात्र, महाडच्या पूल दुर्घटनेनंतर या गाडीलाही प्रवासी संख्या रोडावली आहे. सावंतवाडीहून जाणारी राज्यराणी, दिवा पॅसेंजर, मडगाववरून सुटणारी कोकणकन्या एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस तसेच मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्येही प्रवासी संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे. येत्या रविवारी (७ आॅगस्ट) नागपंचमी सण असूनही मुंबईहून रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी असल्याचे दिसून येत आहे.
राज्यभरात कोसळधारांचे थैमान आहे. नदीनाले भरले आहेत. पूरसदृश स्थिती असल्याने प्रवासाला बाहेर पडणे धोकादायक असल्यानेच प्रवासीसंख्येत घट झाल्याचे दिसत आहे. कोकण रेल्वेच्या स्थानकांवरील आरक्षण कक्षाकडेही प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. आजही या कक्षात शुकशुकाट दिसत होता. एकूणच महाडच्या दुर्घटनेची दहशत कमी होण्यास आठवडाभराचा कालावधी जाणार असल्याचीही चर्चा आहे. (प्रतिनिधी)
मुंबई मार्गावर एस. टी.चेही भारमान घटले
महामार्गावरून कंटेनरला बंदी
वाहतूक शाखेचा निर्णय : मुंबई-गोवा मार्गावर वाहतूक सुरुच