रेल्वे तिकिटांचा काळाबाजार, गोव्यातून एकाला अटक : २८ रेल्वे तिकीटे, लॅपटॉप,मोबाईल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 03:07 PM2020-09-04T15:07:04+5:302020-09-04T15:09:51+5:30
रेल्वे पोलिसांंनी सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणच्या रेल्वेच्या तिकीट विक्री केंद्रांवर छापेमारी केली होती. त्यातून तिकिटांचा काळाबाजार बाहेर आला होता. या प्रकरणात तेव्हा काहींना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, गोव्यातील एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीचा मालक योगेश अंबादास नागवेनकर (रा. म्हापसा-गोवा) संशयाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
सावंतवाडी : रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार होत असल्याच्या संशयावरून रेल्वे पोलिसांंनी सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणच्या रेल्वेच्या तिकीट विक्री केंद्रांवर छापेमारी केली होती. त्यातून तिकिटांचा काळाबाजार बाहेर आला होता. या प्रकरणात तेव्हा काहींना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, गोव्यातील एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीचा मालक योगेश अंबादास नागवेनकर (रा. म्हापसा-गोवा) संशयाच्या भोवऱ्यात सापडला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
रेल्वे पोलिसांंनी २८ रेल्वेची तिकीटे, एक मोबाईल आणि लॅपटॉप असे साहित्यही त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची १५ हजारांच्या जामिनावर मुक्तता केली.
सिंधुदुर्गमध्ये रेल्वे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यावरून चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर २८ फेबु्रवारीला म्हणजेच सहा महिन्यांपूर्वी ठिकठिकाणी छापेमारी करण्यात आली. यात सावंतवाडीसह जिल्ह्यातील अन्य काही ठिकाणांचा समावेश होता. यात मोठ्या प्रमाणात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार आढळून आला होता. या प्रकरणी तेव्हा काही आरोपींना अटकही करण्यात आले होते.
सावंतवाडीतील पोस्टाच्या कर्मचाऱ्यालाही यापूर्वी अटक
या प्रकरणी सावंतवाडी पोस्टाचा कर्मचारी अजय कोळंबकर यालाही पूर्वी अटक करण्यात आली होती. त्याच्याकडे करण्यात आलेल्या सखोल चौकशीत नागवेनकर याच्या सांगण्यानुसार आपण हा प्रकार केल्याचे पोलीस तपासात पुढे आले होते. त्यानुसार नागवेनकर याला कणकवली येथील रेल्वे पोलिसांनी अटक करून सावंतवाडीतील न्यायालयात हजर केले.
यावेळी त्याच्याकडून २८ रेल्वेची तिकीटे, एक मोबाईल आणि लॅपटॉप असे साहित्य जप्त करण्यात आले. न्यायालयाने त्याची पंधरा हजाराच्या जामिनावर मुक्तता केली आहे. आरोपीच्यावतीने अॅड. सुहेब डिंगणकर तसेच अॅड. राहुल पई यांनी काम पाहिले.