रेल्वेचे महिलांकडे दुर्लक्षच!
By admin | Published: October 23, 2015 11:25 PM2015-10-23T23:25:39+5:302015-10-24T00:24:32+5:30
महिलांची खंत : एकच डबा राखीव असल्याने चेंगराचेंगरी
सागर पाटील - रत्नागिरी -रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया काही महिलांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. प्रत्येक गाडीला महिलांसाठी केवळ एकच डबा राखीव असल्याने अनेक महिलांना चेंगराचेंगरीत व उभा राहून प्रवास करावा लागतो. याबाबत रेल्वे प्रशासन कोणताही निर्णय घेत नसल्याबाबतची खंत महिला प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावर ही स्थिती नेहमीच पहायला मिळते.
सध्या पुरुषांप्रमाणे घराबाहेर पडून कुटुंबाला हातभार लावणाऱ्या महिलांच्या प्रभागात वाढ झाली आहे. यामुळे स्वतंत्रपणे प्रवास करणाऱ्या महिलांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून अन्य वर्गांचे तिकीट न घेता महिलांसाठी राखीव असणाऱ्या डब्यातून प्रवास करण्याला प्राधान्य देतात. परंतु, जवळपास सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये महिलांसाठी केवळ एकच डबा असल्याने महिलांसमोर मोठी अडचण निर्माण होताना दिसत आहे. अनेक रेल्वे गाड्यांमध्ये महिलांचा राखीव डबा हा सामान्य डब्यांच्या तुलनेत आकाराने लहान असतो. या डब्यांची आसन क्षमता जवळपास ३२ ते ४० इतकीच असते.
महिलांच्या राखीव डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. बऱ्याचवेळा गाडीतील अन्य डब्यांमध्ये फारशी गर्दी नसते. पण महिलांचा डबा खचाखच भरलेला असतो. महिलांना उभे राहून प्रवास करावा लागतो. यामुळे महिलांमध्ये नेहमीच शाब्दिक चकमकी उडताना पहायला मिळतात. अनेक महिला दरवाजात बसून प्रवास करतात. अगदी लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमध्ये पण हीच परिस्थिती पहायला मिळते.
स्वतंत्र डबे : सुखकर प्रवास हवा
महिलांसाठी स्वतंत्र डबे वाढविणे आवश्यक आहे. यामुळे महिला सुरक्षित व सुखकर प्रवास करु शकतील.
- रचना कदम,
सिंधुदुर्ग.
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये महिलांसाठी राखीव डब्यांची संख्या कमी असल्याने महिलावर्गाची गैरसोय होत आहे. या डब्यांची संख्या वाढवली पाहिजे.
महिलांची बाचाबाची
रेल्वेमध्ये महिलावर्गासाठी असणाऱ्या डब्यांची संख्या कमी असल्याने डब्यात महिलांची गर्दी होते. त्यामुळे महिलांमध्ये बाचाबाची होताना दिसते.