जिल्ह्यात पाऊस...पाऊस आणि पाऊसच!

By admin | Published: September 25, 2016 01:05 AM2016-09-25T01:05:45+5:302016-09-25T01:05:45+5:30

दुसऱ्या दिवशीही संततधार : सावंतवाडीत झाडे पडून लाखोंची हानी, आचरा, नागवे मार्गावरील वाहतूक खंडीत

Rain in the district ... rain and rain! | जिल्ह्यात पाऊस...पाऊस आणि पाऊसच!

जिल्ह्यात पाऊस...पाऊस आणि पाऊसच!

Next

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात शुक्रवारपासून कोसळणाऱ्या संततधार पावसाने शनिवारी दिवसभर उसंत न घेतल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. कणकवलीत संततधार पर्जन्यवृष्टी झाली. पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने कणकवली आचरा व नागवे मार्गावरील वाहतूक खंडीत झाली होती.
सकाळपासूनच मुसळधार पावसाच्या सरीवर सरी कोसळू लागल्या. यामुळे कणकवली-आचरा मार्गावर सेंट उर्त्सुला स्कूलनजिक जानवली नदीच्या पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने दुपारनंतर या मार्गावरील वाहतूक बंद पडली. नागवे रस्त्यावर कडूलकर बागेजवळ व नागेश्वर मंदिराजवळील मोरीवर पुराचे पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक सायंकाळपर्यंत बंद होती. कलमठ कुंभारवाडी मार्गावरही पुराचे पाणी आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. सातरल-कासरल मार्गावरही पुराचे पाणी आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. अतिवृष्टीचा परिणाम कोकण रेल्वेवरही झाला. रेल्वे मार्गावरील वाहतूक धीम्यागतीने सुरू होती. गाड्या चार ते पाच तास उशीराने धावत होत्या. शहराजवळील जानवली गावातील महाजनीनगर, कलेश्वरनगर भागात पुराचे पाणी घुसल्याने एकच खळबळ उडाली. शहरातील गणपतीसाना पुराच्या पाण्यात बुडाला. हे पुराचे पाणी चौंडेश्वरी मंदिरापर्यंत आले होते.
मुंबई-गोवा महामार्गावरील असलदे-तावडेवाडी येथे पियाळी नदीला आलेल्या पुरामुळे आजुबाजुच्या शेतीत पाणी घुसले. कासार्डे नागसावंतवाडी, खानसरी भागात पुराचे पाणी घुसले. वाघेरी पुळाचीवाडी येथील कुर्ली-घोणसरी धरणाचे पाणी सखल भागात शिरले होते. पियाळी येथील अमृत भीमराव चौगुले यांच्या घराला पुराच्या पाण्याने वेढा दिला. लोरे नं १ येथील काही घरात कालव्याचे पाणी घुसून नुकसान झाले. कासार्डे-झारेश्वरवाडी अतिवृष्टीमुळे अनंत नामदेव शेलार यांच्या घराची पडवी पडून १२ हजारांचे नुकसान झाले.
बसस्थानक, बाजारात पाणी
फोंडाघाट : फोंडाघाट उगवाई नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे नदी शेजारी असलेल्या हिर्लेकर यांच्या घरात पाणी शिरल्याने मोठी हानी झाली. तर फोंडा बसस्थानकाला पाण्याने घेरले होते. रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली चालू वर्षी बाजारपेठेतील रस्त्याच्या दुतर्फा असलेली गटारे साफ न केल्याने संपूर्ण बाजारपेठ तसेच बस स्थानक परिसरात तीन फुटांपर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे प्रत्येक व्यापाऱ्याच्या तोंडातून बांधकाम विभागाच्या कारभार विरोधात स्तुतीसुमने उधळली जात होती.
वादळी वाऱ्यासह पाऊस
सावंतवाडी : तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे अनेक ठिकाणी पडझड होऊन सुमारे अडीच लाखांची हानी झाली आहे. सावंतवाडी शहरात खासकीलवाडा व उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरात दोन वृक्ष कोसळले. यात डंपर, कार व दुचाकी गाड्यांचे नुकसान झाले असून, ठिकठिकाणी किरकोळ स्वरुपाची पडझड झाल्याची नोंद तहसील कार्यालयात करण्यात आली आहे. शनिवारी पहाटेपासून पडणाऱ्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे सावंतवाडी-खासकीलवाडा येथील सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास अर्पण मेडिकलसमोरील रस्त्याच्या बाजूला उभ्या करुन ठेवलेल्या डंपरवर गुलमोहोराचे झाड पडून डंपरचे नुकसान झाले. तसेच वीज ताराही रस्त्यावरच लोंबकळत असल्याने त्या भागातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारातील चिंचेचे झाड कोसळून डॉ. संदीप सावंत यांनी उभी करुन ठेवलेल्या कारचे व त्याच्या बाजूलाच उभ्या असलेल्या बंड्या आरेकर यांच्या दुचाकीचे नुकसान झाले. डॉ. सावंत यांचे जवळपास पावणेदोन लाखांचे नुकसान झाले आहे. याशिवाय वीज वाहिन्यांवर झाड पडल्याने वीज मंडळाचे नुकसान झाले आहे. काही काळ परिसरात वीज गायब होती.
भातशेतीची नुकसानी होणार
कुडाळ : तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक गावातील भातशेती पाण्याखाली गेली असल्याने भातशेतीचे नुकसान वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. तालुक्यातील भातशेती आता पूर्णत्त्वास जात असतानाच सतत पावसाचा जोर वाढत राहिल्यास नदीपात्रानजीकच्या काही गावांना पुराचा धोका निर्माण होणार आहे. तसेच कुडाळ शहरातही पावसामुळे रस्त्यावर गटारातील पाणी आले होते. तसेच शहरातील आंबेडकरनगर भागाला पुराचा धोका संभवत आहे.
वेंगुर्लेत वीजेचा लपंडाव
वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यासह शहरात गेले दोन दिवस सतत पाऊस पडत असून पावसामुळे तालुक्यात कुठेही नुकसान झाल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे झालेली नाही. गेल्या तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसाने सर्वत्र पाणीपाणी करून सोडल्याने जनजीवन विस्कळीत झाले. या दरम्यान, वारंवार वीजेचा दिवसरात्र लपंडाव सुरु असल्याने नागरिकांत धास्ती निर्माण झाली
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rain in the district ... rain and rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.