गणेशोत्सवावर पावसाचे सावट

By admin | Published: September 14, 2015 11:46 PM2015-09-14T23:46:06+5:302015-09-14T23:52:41+5:30

सिंधुदुर्गात संततधार : बाजारपेठेतील उलाढालीवर परिणाम; यंत्रणा अलर्ट

Rain fall on Ganesh Festival | गणेशोत्सवावर पावसाचे सावट

गणेशोत्सवावर पावसाचे सावट

Next

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी सकाळपासूनच अधून-मधून जोरदार पाऊस कोसळत होता. सोमवारीही दिवसभर ढगाळ वातावरणासह कोसळणाऱ्या संततधार पावसाने गणेशोत्सवावर पावसाचे सावट राहणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कोकण रेल्वे, एस. टी., खासगी प्रवाशी गाड्यांमधून लाखो चाकरमानी सिंधुदुर्गात दाखल होण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे संबंधित यंत्रणा अलर्ट झाली आहे.
दरवर्षी धो धो कोसळणारा पाऊस यावर्षी म्हणावा तसा पडलाच नाही. त्यामुळे भात शेतीच्या हंगामात शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. सप्टेंबर महिना सुरु झाल्यानंतरही जोरदार पाऊस नसल्याने सर्वत्र काळजीचे वातावरण होते. अधून-मधून पावसाच्या तुरळक सरी कोसळत होत्या. मात्र, गेले दोन दिवस जोरदार पावसाने ‘कम बॅक’ केला आहे. ढगांचा गडगडाटही होत आहे. रविवारपासून तर पावसाचे प्रमाण वाढल्याने गणेशोत्सवाच्या
तयारीत गुंतलेले भाविक धास्तावले आहेत. पावसामुळे बाजारपेठेत येणाऱ्या ग्राहकांवरही परिणाम होत असल्याने व्यापारीही चिंताग्रस्त झाले आहेत. बाजारपेठेतील उलाढालीवर पावसामुळे निश्चितच परिणाम होणार आहे. त्यामुळे त्याचा फटका मोठ्या व्यापाऱ्यांबरोबरच छोट्या व्यापाऱ्यांनाही बसणार आहे. त्याचप्रमाणे गणरायाच्या दर्शनासाठी मित्र परिवाराकडे जाण्यावर मर्यादा येणार असल्याने तरुणवर्ग काहीसा नाराज आहे.
दरम्यान, पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावल्याने शेतकरीवर्गातून आनंद व्यक्त होत असला तरी पावसाचा जोर असाच राहिला तर ऐन उत्सवाच्या काळात भक्तांच्या आनंदावर
विरजण पडणार आहे, तर
दुसरीकडे जिल्ह्यातील धरणे किंवा पाणी साठे पूर्णपणे भरले नसल्याने आगामी काळातील पाणी टंचाईपासून मुक्तता होण्यासाठी पावसाची
गरज आहे, अशा प्रतिक्रियाही
सर्वत्र ऐकायला मिळत आहेत. (वार्ताहर)

 

Web Title: Rain fall on Ganesh Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.