कलिंगडाच्या शेतीला पावसाचा तडाखा
By admin | Published: March 29, 2015 11:01 PM2015-03-29T23:01:39+5:302015-03-30T00:19:51+5:30
आठ एकर शेतीचे नुकसान : शेतकरी हवालदिल, आंबा-काजूच्या धर्तीवर नुकसानभरपाईची मागणी
शिवाजी गोरे - दापोली कोकणातील शेतकरी अलिकडे केवळ भातशेतीवर अवलंबून न राहता दुबार पीक घेऊ लागला आहे. भातशेतीचा हंगाम संपल्यावर भाजीपाला, कलिंगडाचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेतले जात आहे. दापोली तालुक्यात ठिकठिकाणी आता कलिगडांची लागवड केली जात आहे. पंकज सुरेश जागडे या तरुण शेतकऱ्याने १२ वर्षे कलिंगड शेतीचा यशस्वी प्रयत्न केला होता. मात्र, पावसाने कलिंगड पिकावर करपा पडून संपूर्ण पीक हातचे गेल्यामुळे जीवन जगायचे कसे, हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे.
अवकाळी पावसाने आंबा, काजूचे नुकसान झाल्याने बागायतदार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी कृषी विभागामार्फत पंचनामे सुरु आहेत.आंबा, काजू नुकसान भरपाईचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी विभागाला मिळाल्याने पंचनामे सुरु झाले आहेत. पंरतु कलिंगड शेतीचा पंचनामा न झाल्याने नुकसान भरपाई मिळेल की नाही, याबद्दल शेतकऱ्याला चिंता वाटू लागली आहे.
पंकज जागडे हा गेली १२ वर्षे कलिंगड शेती करीत आहे. स्वत:कडे जमीन नसतानासुद्धा भाड्याच्या जमिनीत कलिंगडाची लागवड करुन सुशिक्षीत बेकार तरुण मोठ्या जिद्दीने उभा राहात होता. यावर्षीसुद्धा ८ एकर जमिनीवर कलिंगडाची लागवड केली होती. २ लाख रुपये कर्ज काढून भाड्याने जमीन घेऊन मोठ्या जिद्दीने कलिंगडाची लागवड केली होती. पंकज जागडे व प्राजक्ता जागडे या जोडप्याने दिवसरात्र मेहनत करुन कलिंगड शेती केली होती. शेतसुद्धा मोठ्या जोमाने वाढले. कर्ज फिटून आपल्याला ३ लाख ते ४ लाख रुपये नफा मिळेल, अशी अपेक्षा बाळगून सुखी कुटुंबाची स्वप्नसुद्धा रंगवली जात होती. मात्र, अवकाळी पाऊस आला व होत्याचे नव्हते झाले. अवकाळी पावसाने कलिंगडाच्या वेलीवर करपा पडला व संपूर्ण वेलच वाळून गेली.
करपा पडल्यानंतर अवघ्या दोन - तीन दिवसात शेती नष्ट झाली. कलिंगडाचे पीक तयार होण्याच्या मार्गावर होते. परंतु अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे या शेतकऱ्याच्या आशा धुळीस मिळाल्या. दर्जेदार उत्पन्न घेण्यासाठी कलिंगडाची इंडो अमेरिका, अगस्ता ३ किलो बियाण्याची लागवड केली. औषध फवारले, पंपाने नदीचे पाणी आणून कलिंगड शेती फुलविली. या शेतीतून चांगले उत्पन्न मिळेल, असे वाटत असताना अवकाळी पाऊस झाला.
कोकणात केवळ आंबा, काजूला मदत दिली जाते. परंतु आंबा, काजूप्रमाणे इतर पिकांनासुद्धा नुकसान भरपाई मिळावी. कलिंगड पिकाचे नुकसान झाल्याने आमचा संसारच उद्ध्वस्त झाला आहे. बँकेचे कर्ज कसे फेडायचे, याचीच काळजी वाटत आहे. स्वत:ची शेतजमीन नसल्यामुळे भाड्याची शेती घेऊन वर्षातून एकदाच कलिंगड पीक घेतो. त्या पिकावर आमचा उदरनिर्वाह चालतो. आता पीकच गेले जीवन जगायचे कसे हा प्रश्न भेडसावत आहे.
- पंकज जागडे, शेतकरी