करुळ घाटात दरड कोसळली, वैभववाडी तालुक्यात पावसाची संततधार सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:09 AM2019-09-09T11:09:02+5:302019-09-09T11:10:27+5:30
वैभववाडी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरू असून सायंकाळी उशिरा एकेरी वाहतूक सुरू करण्यात बांधकाम विभागाला यश आले.
वैभववाडी : तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे करुळ घाटात दरड कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्याचे काम सुरू असून सायंकाळी उशिरा एकेरी वाहतूक सुरू करण्यात बांधकाम विभागाला यश आले.
दरम्यान, कुर्ली येथे एका घरावर विजेचा खांब कोसळून नुकसान झाले आहे. गगनबावडा तालुक्यातील मांडकुली येथील रस्यावर आलेले पाणी ओसरल्यामुळे गगनबावडा-कोल्हापूर हा मार्ग शुक्रवारी रात्री दोन वाजल्यापासून खुला करण्यात आला आहे.
तालुक्यात शुक्रवारी दिवसभर पावसाचा जोर किंचित कमी झाला होता. मात्र, रात्रीपासून पुन्हा पावसाचा जोर वाढला. सतत पडणाऱ्या पावसामुळे करुळ घाटात दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. दगड-मातीसोबत झाडेही उन्मळून रस्त्यावर कोसळली. त्यामुळे तळेरे-कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली.
या मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने अवघ्या काही मिनिटांत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. दरड रस्त्याच्या मध्यवर्ती ठिकाणी पडल्यामुळे वाहनचालकांना वाहने वळविण्यास संधीच नव्हती. त्यामुळे शेकडो वाहनचालक घाटातच अडकले होते.
दरड कोसळल्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी जेसीबी घेऊन घटनास्थळाकडे निघाले. त्याचबरोबर पोलीस कर्मचारीदेखील घटनास्थळी पोहोचले. जेसीबीच्या सहाय्याने दरड हटविण्यास सुरुवात करण्यात आली. दीड तासानंतर घाटरस्त्यातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात बांधकाम विभागाला यश आले. त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत दरड हटविण्याचे काम सुरू होते.
करुळ आणि भुईबावडा या दोन्ही घाटरस्त्यांमध्ये दरडी कोसळण्याचे प्रकार सातत्याने सुरू आहेत. तीन-चार दिवसांपूर्वी भुईबावडा घाटात दरड कोसळली होती. त्यामुळे त्या मार्गावरील वाहतूक दोन दिवस ठप्प झाली होती.
कुर्ली-खडकदारा येथील वीज खंडित
दरम्यान, तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुर्ली खडकदारा येथील मानाजी शेळके यांच्या घरालगत वीज खांब उन्मळून घरावर पडला. मात्र, घरातील कुणालाही सुदैवाने दुखापत झाली नाही. या प्रकारामुळे सर्व वाडीतील वीजपुरवठा खंडित झाला आहे.