सिंधुदुर्गात कडकडाटासह पाऊस; शिवडाव, कळसुली परिसरात पडल्या गारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 08:36 PM2020-04-11T20:36:09+5:302020-04-11T20:36:21+5:30
आधीच कोरोनाचे संकट त्यात अवकाळी पडलेला पाऊस यामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे.
सिंधुदुर्गनगरी: जिल्ह्यात ठिकठिकाणी शनिवारी कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला. ध्यानीमनी नसताना उन्हाळ्यात अचानक पाऊस झाल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. या अवकाळी पावसाचा आंबा व काजू पिकावर परिणाम होणार आहे. त्यामुळे आंबा बागायतदार शेतकरी मात्र पुरता अडचणीत सापडला आहे. आधीच कोरोनाचे संकट त्यात अवकाळी पडलेला पाऊस यामुळे सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कमालीची उष्णता वाढली आहे. सुमारे ४० डिग्री तापमान होत आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. गेले काही दिवस गडगडाट होत होता. काही ठिकाणी अवकाळी पाऊस देखील झाला होता. मात्र तो जोरदार झाला नव्हता. आज सायंकाळी जिल्हयातील बऱ्याच भागात पाऊस झाला. काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या सरी पडल्या, तर काही ठिकाणी दमदार पाऊस झाला. ध्यानीमनी नसताना अगदी उन्हाळ्याच्या तोंडावर पाऊस झाला.
सध्या आंबा व काजूचा सीजन मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. कोरोनामुळे याला मर्यादा आल्या आहेत. आंबा परजिल्ह्यात वाहतुकीस जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे आंबा व्यावसायिकांना थोडा आर्थिक दिलासा मिळाला होता. परंतु आता अचानक पडलेल्या पावसाने या दोन्ही पिकांना धोका पोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे बागायतदार पुरते अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
वैभववाडीसह सहयाद्री पट्यात रिमझिम
वैभववाडी परिसरासह सह्याद्री पट्ट्यात रिमझिम अवकाळी पाऊस झाला. सायंकाळी पाचच्या सुमारास पडलेल्या पावसामुळे हवेत अंशतः गारवा निर्माण झाला. गेल्या तीन दिवसांपासून दुपारनंतर तालुक्यात काहीसे ढगाळ वातावरण दिसून येत होते. हवामान खात्यानेही जिल्ह्यात गडगडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवता होता. त्यानुसार सह्याद्री पट्ट्यात सायंकाळी गडगडाटासह तुरळक पाऊस झाला. सायंकाळी पाचच्या सुमारास वैभववाडी परिसरात रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे हवेतील उकाड्याची तीव्रता कमी होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला.
शिवडाव, कळसुली परिसरात गारांचा पाऊस
सायंकाळी जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला. शिवडाव, कळसुली येथील परिसरात मोठं मोठ्या गारा पडल्या. त्याचे व्हिडिओ ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.