Sindhudurg News: मांगवली परिसराला वळवाने झोडपले
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: April 29, 2023 07:52 PM2023-04-29T19:52:29+5:302023-04-29T19:53:53+5:30
अर्धा तास झालेल्या या पावसामुळे सर्वांची तारांबळ उडाली
वैभववाडी (सिंधुदुर्ग) : मांगवली परिसराला शनिवारी दुपारी वळवाच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. या भागात सुमारे अर्धा तास पाऊस झाला. दरम्यान, वैभववाडी शहर परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. तालुक्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते.
दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. शुक्रवारी रात्री पावसाचे वातावरण तयार झाले होते; परंतु पाऊस पडला नव्हता. शनिवारी सकाळपासून तालुक्यात सर्वत्र ढगाळ वातावरण होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मांगवली, वेंगसर, उंबर्डे, तिरवडे, भुईबावडा, हेत या भागांत वळवाच्या पावसाला सुरुवात झाली. मांगवली परिसराला तर पावसाने झोडपून काढले.
अर्धा तास पडत असलेल्या या पावसामुळे सर्वांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यानंतर वैभववाडी, एडगाव, सोनाळी, कुसूर, नापणे, कोकिसरे, खांबाळे, आचिर्णे, लोरे भागांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. हवामान खात्याचा अंदाज अवकाळी पावसाने तंतोतंत खरा ठरवला. या वळवाच्या पावसामुळे सायंकाळी वातावरणात थोडा गारवा निर्माण झाला.