सावंतवाडी तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस; अनेक गावे अंधारात
By अनंत खं.जाधव | Published: October 1, 2023 07:17 PM2023-10-01T19:17:04+5:302023-10-01T19:17:58+5:30
मोठ्या प्रमाणात नुकसान
सावंतवाडी : शहरासह तालुक्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी रस्त्यावरील झाडे उन्मळून घरावर व मांगरावर पडल्याने मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे . या वादळी वाऱ्यासह पडत असलेल्या धुवाधार पावसामुळे अनेक गावात वीज पुरवठा खंडित झाला आहे.तर नेमळे गावात तर गेले पाच दिवस विज पुरवठा खंडित झाला आहे.त्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत.
कोलगाव ,बांदा ,माडखोल, नेमळे सांगेली गावात वीज वितरणचे पोल तुटून ,विद्युत वाहिन्यां तुटून रस्त्यावर पडल्या आहेत त्यामुळे वीज वितरण ते जवळपास लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. निगुडे मधलीवाडी येथील रामदास काशिनाथ नाईक यांच्या घरावर सागवान चे झाड पडून दहा हजाराचे नुकसान झाले आहे.
तर शेर्ले गावात सागर मेस्त्री याच्या घराची मुसळधार पावसात भिंत कोसळून पन्नास हजाराचे नुकसान झाले आहे.तर आजगांव भोमवडी येथील भिकाजी पांडुरंग मालजी यांच्या मांगरावर काल रात्री माड पडून अंदाजे 60000/- चे नुकसान झाले आहे. नेमळे येथे झाड पथदीप कोसळले आहेत असे जवळपास चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
हे सर्व गेले दोन दिवस झालेल्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झाले आहे. शनिवारी आंबोली ,इन्सुली घाटीत झाड पडले होते. ते झाड सार्वजनिक बांधकाम, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दूर केल्याने वाहतूक सुरळीत झाली पडत असलेल्या धुवाधार पाऊस व वादळी वाऱ्यासह सावंतवाडी तालुक्यात भात शेती पिकली आहे त्यामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.असे कृषी विभागाने स्पष्ट केले . वीज वितरण चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशी माहिती उपकार्यकारी अभियंता के. एच चव्हाण यांनी दिली .
नेमळे गाव पाच दिवस अंधारात
मुसळधार पडलेल्या पावसामुळे भले मोठे जांभळाचे झाड वीज तारांवर कोसळल्यामुळे नेमळे दोन पोल तुटून नुकसान झाले आहे वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वीज मंडळाकडून प्रयत्न सुरू आहे. हे काम लवकरात लवकर करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.गेल्या चार-पाच दिवसात पडलेल्या पावसामुळे हे झाड नेमळे-पाटकरवाडी येथे मुख्य रस्त्यावर कोसळले होते. ते दुर करण्यात आले. परंतु वीज पुरवठा अद्याप सुरळीत झाला नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.