सिंधुदुर्गात पावसाची संततधार; महिन्याभरात ३९ घरांची पडझड, लाखोंचे नुकसान
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: July 4, 2024 07:18 PM2024-07-04T19:18:14+5:302024-07-04T19:19:02+5:30
धरणे, तलावांच्या पाणी पातळीत वाढ
गिरीश परब
सिंधुदुर्ग : बुधवारी रात्रभर पडलेल्या संततधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. धरणे, तलावांची पाणी पातळी वाढली आहे. जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी सकाळ पासून पावसाने उसंत घेतली. तर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. दरम्यान गेल्या महिन्याभरात ३९ घरांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेतीयोग्य पाऊस होत असल्याने बळीराजा सुखावला आहे. शेतीच्या कामांना गती प्राप्त झाली आहे. बैलाच्या, यंत्राच्या साहाय्याने नांगरणी व लावणीची कामे सुरू आहेत. ग्रामीण भागात सध्या शेतकरी सकाळी घर सोडून थेट संध्याकाळी माघारी परतत आहे. सकाळची न्याहरी, जेवण सर्व काही शेतात लावणीच्या ठिकाणी करताना दिसून येत आहे.
दरम्यान बुधवारी रात्रीपासून ते पहाटेपर्यंत जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू होता. नद्यांची धोका पातळी वाढली नसली तरी नद्यांमध्ये पाण्याचा जोर आहे. सकाळी पावसाचा जोर कमी झाला. बऱ्याच ठिकाणी ऊन पडले होते. कालच्या पावसाने २ घरांची पडझड झाली.
निकषात बसत असल्यास नुकसानग्रस्तांना मदत
पाऊस सुरू झाल्यापासून दररोज घरांची पडझड झालेली अहवालाच्या माध्यमातून दिसून येत आहे. विशेष करून घरांना लागून असलेली झाडे घरावर कोसळून घरांची पडझड होत आहे. काही सरकारी मालमत्तेचेदेखील नुकसान झाल्याची नोंद आहे. सरकारी व खासगी मालमत्तांच्या नुकसानीचा आकडा प्रशासनाने जाहीर केलेला नाही. पंचनाम्यानंतर निकषात बसत असल्यास नुकसानग्रस्तांना मदत दिली जाणार आहे.
९ प्रकल्प भरले; पाण्याचा विसर्ग सुरू
कोरले सातंडी मध्यम पाटबंधारे पूर्ण क्षमतेने भरल्याने गेल्या १० दिवसांपासून या धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्याच बरोबर आंबोली, हातेरी, माडखोल, सनमटेंब, हरकुळ, ओझरम, निळेली, पावशी, लोरे हे लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.