जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला
By admin | Published: August 7, 2016 12:37 AM2016-08-07T00:37:58+5:302016-08-07T01:02:08+5:30
खारेपाटण गावात पाणी घुसले : पूरजन्य स्थिती; कसाल येथे घराची भिंत कोसळली
ओरोस/खारेपाटण : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. खारेपाटण शहरात तर पाणी घुसले असून तेथे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
पावसामुळे कुडाळ तालुक्यात कसाल बौद्धवाडी येथे काशिबाई राजाराम पाडगांवकर यांच्या घराची भिंत कोसळली. याठिकाणी कसालचे तलाठी बी. एन. हातवटे, कोतवाल सुरेश परब, घरमालक काशिबाई पाडगांवकर यांच्यासमोरच पाहणी करून पंचयादी घालण्यात आली व योग्य तो मोबदला दिला जाईल असे तलाठी हातवटे यांनी आश्वासन दिले.
जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसामुळेच काशिबाई पाडगांवकर यांच्या घराची भिंत सकाळी ६.३० वाजता कोसळली. घरातील पाचहीजण सुखरुप आहेत. त्यांच्या घराच्या शेजारी असणाऱ्या विजया दत्ताराम कदम यांच्या घराची कौले उडून गेली आहेत. या दोन्ही घरांची पंचयादी हातवटे यांनी केली.
नैसर्गिक आपत्ती प्रकरणात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदार कार्यालयाकडे कागदपत्रे पाठविली आहेत. मुसळधार पावसामुळे खारेपाटण येथे पाणी घुसले असून त्यामुळे शहरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
खारेपाटण येथे शनिवारचा आठवडा बाजार होता. त्यामुळे पहाटेच कोल्हापूरहून व्यापारी येथे येत असतात. पण शहरात पहाटे चारपासून पाणी घुसल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरून शहरात येणारा मुख्य रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. त्यामुळे एस. टी. महामंडळाच्या गाड्या खारेपाटण बसस्थानकात न आणता खारेपाटण महामार्गावरच थांबविण्यात आल्या. तर शनिवारचा आठवडा बाजार महामार्गावरील खारेपाटण वरच्या स्टँडवर भरविण्यात आला.पहाटे घुसलेले पुराचे पाणी सकाळी १० वाजल्यानंतर हळूहळू ओसरू लागले. मात्र काही पालकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठविणेच पसंत केले. दरम्यान, खारेपाटण बाजारपेठ ते भैरीआळी, जैनवाडीकडे जाणारा रस्ता तसेच खारेपाटण हायस्कूल ते बसस्थानकाकडे येणारा रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. त्यामुळे प्रवाशांना एस. टी. बस पकडण्यासाठी महामार्गावर जावे लागत होते. खारेपाटण येथील मच्छि मार्केट इमारतीमध्ये तसेच अमोल तळगावकर यांच्या बंगल्याला चारी बाजूंनी पाण्याने वेढले होते. तसेच गुरव कॉम्प्लेक्समध्ये पुराचे पाणी शिरले होते. मच्छि मार्केटकडील सर्व छोट्या दुकानात पाणी घुसले होते. तसेच खारेपाटण येथील भैरीआळी, जैनवठार, बंदरवाडी, शिवाजीपेठ, काझीवाडा, चर्मकारवाडी, कपिलेश्वर वाडी, रामेश्वर मंदिर आदी भागात पुराचे पाणी घुसले होते. तर बिगे भाटले येथील भातशेती व भाटी येथील भातशेती पूर्णत: पाण्याखाली गेली होती. पुरामुळे बाजाराला येणाऱ्यांची तारांबळ उडाली. बाजार नेमका कुठे भरणार हे त्यांना माहित नव्हते. पण नेहमीप्रमाणे हा बाजार मुंबई-गोवा महामार्गावर भरविण्यात आला. खारेपाटण घोडेपाथर बंदर येथे १० फूट खोल पाणी रस्त्यावर आले होते. त्यामुळे येथील नागरिकांना पर्यायी पायवाटेने खारेपाटण बाजाराकडे जावे लागले.(वार्ताहर)
सावधानतेचा इशारा : २४ तासात ५८.६३ मिमी पाऊस
येत्या ४८ तासांत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे जिल्हावासियांनी जिवीत व मालमत्तेची योग्य ती खबरदारी घ्यावी, असा सावधानतेचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ५८.६३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुकानिहाय पाऊस असा- दोडामार्ग ३५, सावंतवाडी ४५, वेंगुर्ले १७, कुडाळ ७२, मालवण ३६, कणकवली १०१, देवगड ४९, वैभववाडी ११४.