पावसाच्या पाण्यात शेती गेली वाहून, बांदा परिसरातील बळीराजा संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 03:23 PM2020-07-23T15:23:52+5:302020-07-23T15:25:05+5:30
बांदा परिसरातील गावांना गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. याचा फटका या गावांतील शेतकऱ्यांना बसला.
बांदा : बांदा परिसरातील गावांना गेले काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढले. याचा फटका या गावांतील शेतकऱ्यांना बसला.
अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेली तर एका शेतकऱ्याच्या शेतालाच मोठाले भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे पिकांची झालेली नुकसान भरपाई मिळणार की नाही या चिंतेत बळीराजा अडकला आहे. प्रशासनाने भरपाई द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्तांमधून होत आहे.
मागील आठ दिवस पावसाने ग्रामीण भागाला झोडपून काढले. बांदा, वाफोली, विलवडे, इन्सुली पाडलोस, न्हावेली-रेवटेवाडी, शेर्ले तसेच मडुरा परिसरात केलेली भात लावणी काही ठिकाणी पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. काही ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेल्याने अपेक्षेप्रमाणे पीक मिळणार की नाही याची चिंता शेतकऱ्यांना पडली आहे.
पावसाच्या पाण्याच्या लोटामुळे केणीवाडा येथे भातशेतीत मोठाले भगदाडच पडले आहे. त्यामुळे झालेल्या नुकसानीची प्रशासनाने भरपाई देण्याची मागणी शेतकरी हर्षद परब यांनी केली आहे.