जिल्ह्यात अवकाळी पावसाचा दणका

By admin | Published: November 21, 2015 11:03 PM2015-11-21T23:03:10+5:302015-11-21T23:57:50+5:30

कलंबिस्त येथे वीज कोसळली : तिघे बचावले; घराचे नुकसान, वीज उपकरणे खाक

Rainfall in the district suddenly | जिल्ह्यात अवकाळी पावसाचा दणका

जिल्ह्यात अवकाळी पावसाचा दणका

Next

सिंधुदुर्गनगरी : शनिवारी मालवणसह सावंतवाडी, कुडाळ, कणकवलीत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मालवण शहरात माड वीज खांबावर कोसळून वाहिन्या तुटून पडल्याने नुकसान झाले. सलग दोन दिवस देवगडमध्ये पडलेल्या पावसामुळे आंबा पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त-घनशेळवाडी येथे राहणाऱ्या सावंत कुटुंबीयांच्या घरावर वीज कोसळल्याने हे कुटुंब थोडक्यात बचावले. घराची प्रचंड हानी झाली आहे.
कलंबिस्त येथे अनंत शिवराम सावंत यांच्यासह त्यांची पत्नी अपर्णा व मुलगा चेतन हे तिघे घरात होते. विजेचा लोळ घरावर कोसळताच घरातील सर्वजण बाहेर आल्याने हे कुटुंब बचावले. मात्र, विजेच्या तडाख्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे, तर घरातील विजेची साधने जळून खाक झाली. घराच्या मागील भिंतीला मोठे तडे गेले आहेत. अन्य भिंतींना लहान भेगा गेल्याने कुटुंब भयभीत झाले आहे. उशिरापर्यंत याबाबत महसूल विभागाला माहिती नव्हती.
जिल्ह्यात गेले दोन दिवस पडणाऱ्या परतीच्या पावसाने शनिवारी मालवण तालुक्याला दमदार सरींनी झोडपले. दुपारनंतर तालुक्यात ठिकठिकाणी विजेच्या गडगडाटासह पाऊस कोसळला. पावसात वाऱ्याचाही जोर वाढल्याने पडझडीच्या घटना घडल्या आहेत. शहरातील भरड परिसरातील मयेकर कुटुंबीयांचा माड रस्त्यावर कोसळल्याने वीज खांब तसेच वीज वाहिन्याही तुटून गेल्या होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष बाळू कोळंबकर, नगरसेवक महेंद्र म्हाडगुत यांच्यासह नागरिकांनी रस्त्यावर कोसळलेला माड बाजूला केला. मात्र, वीजवाहिन्या रस्त्यावर पडल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प होती. तालुक्यातील अनेक गावांतही भातकापणी करत असलेल्या शेतकऱ्यांचे व आंबा काजू बागायतदारांचे नुकसान झाले आहे. काही गावांत वीजपुरवठा सायंकाळी उशिरापर्यंत खंडित झाला होता. देवगड तालुक्यामध्ये गेले दोन दिवस सलग अवकाळी पाऊस पडल्याने आंबा पीक धोक्यात आले आहे. शनिवारी दुपारपासून पावसाने हजेरी लावली होती. विजयदुर्ग परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात, तर देवगड परिसरामध्ये तुरळक प्रमाणात पाऊस पडला. शनिवारी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने आंबा पिकावर याचा परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विजयदुर्ग, गिर्ये, पुरळ, पडेल, वाडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला, तर देवगड, जामसंडे, तळेबाजार, कुणकेश्वर या ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडल्या. यामुळे आंबा कलमावर आलेला मोहोर काळा पडून वाया जाण्याची शक्यता जाणकार बागायदारांकडून वर्तविण्यात येत आहे. शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. गेली आठ वर्षे सातत्याने अवकाळी पाऊस पडून आंबा पिकाचे नुकसान होत आहे. याहीवर्षी मोहोर येण्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने आंबा बागायतदार चिंतातूर झाले आहेत. अवकाळी पडलेल्या पावसामुळे आलेला मोहोर वाया जातो, कलमांवर बुरशी व किटकांचा प्रादुर्भाव वाढतो.
अवकाळीने कुडाळ तालुक्यातही मेघगर्जनेसह जोरदार हजेरी लावली असून या अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. कुडाळ शहराबरोबरच तालुक्यातील अनेक गावांत पावसाने हजेरी लावली. सायंकाळी त्याने विश्रांती घेतली. (प्रतिनिधी)

Web Title: Rainfall in the district suddenly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.