मालवण बाजारपेठेला पावसाचा फटका, अल्प दरात वस्तू विकण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 04:16 PM2019-09-02T16:16:55+5:302019-09-02T16:19:27+5:30
गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाचा गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर भरलेल्या बाजारास मोठा फटका बसला. भाजीपाल्यासह अन्य साहित्य भिजल्याने विक्रेत्यांदा अल्प दरात त्याची विक्री करावी लागली.
मालवण : गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाचा गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर भरलेल्या बाजारास मोठा फटका बसला. भाजीपाल्यासह अन्य साहित्य भिजल्याने विक्रेत्यांदा अल्प दरात त्याची विक्री करावी लागली.
गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस गणेशभक्तांकडून जोरदार तयारी सुरू होती. तीन-चार दिवसांपासून चाकरमानीही दाखल होण्यास सुरुवात झाली. मात्र, गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भक्तांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. पावसामुळे काही भाविकांनी शनिवारपासून गणेशमूर्ती घरी नेण्यास सुरुवात केली होती.
रविवारी सकाळपासून मुसळधार पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे भाविकांना आपल्या गणेशमूर्ती घरी नेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. प्लास्टिकचा आधार घेत भाविक आपले गणपती घरी नेत असल्याचे दिसून आले.
मालवणचा बाजार हा भाजी मंडईलगतच्या रस्त्यावर भरतो. त्यामुळे हा रस्ता गर्दीने फुलून गेलेला असतो. मात्र, रविवारी सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे भाजी विक्रेत्यांची भाजी तसेच साहित्य पावसाने भिजून गेले. गटारालगत बसलेल्या भाजी विक्रेत्यांची भाजी गटारातून वाहणाऱ्या पाण्यामुळे भिजल्याने भाविकांनी त्याची खरेदीकरण्याकडे दुर्लक्ष केले.
काही विक्रेत्यांना तर भाजी टाकून देण्याची तर काहींना ती अत्यल्प दरात विकण्याची नामुष्की ओढवली. सायंकाळनंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला होता. त्यामुळे भाविकांनी आपल्या गणेशमूर्ती नेण्यासाठी गणेशमूर्ती चित्रशाळांमध्ये गर्दी केल्याचे दिसून येत होते.
रात्री उशिरापर्यंत भाविक वाजतगाजत आपल्या गणेशमूर्ती घरी नेत होते.
भाविकांसह व्यावसायिकांचे हाल
गेले दोन दिवस पावसाचा जोर कायम राहिल्याने बाजारपेठेतील व्यावसायिकांसमोर चिंतेचे वातावरण होते. गणेश चतुर्थीच्या निमित्ताने लागणारे माटवीचे साहित्य, भाजीपाला, विविध प्रकारचे फळे, सजावटीच्या साहित्याने बाजारपेठ फुलून गेली होती. मात्र सकाळपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने खरेदीसाठी आलेल्या भाविकांची तारांबळ उडाली.
तालुक्यातील विविध गावांमधून भाविक खरेदीसाठी बाजारात येत असल्याने मोठी गर्दी उसळते. मात्र, यावर्षी रविवारच्या बाजाराच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाने भाविकांसह व्यावसायिकांचेही हाल झाले.