पावसाचा कणकवली तालुक्याला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 04:48 PM2019-09-27T16:48:25+5:302019-09-27T16:51:40+5:30
परतीच्या पावसाचा कणकवली तालुक्याला फटका बसला आहे. तालुक्यातील कलमठ महाजनी नगर, कलेश्वरनगर, लांजेवाडी आणि वरवडे फणसनगर भागात मंगळवारी पाणी घुसल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली होती.
कणकवली : परतीच्या पावसाचा कणकवली तालुक्याला फटका बसला आहे. तालुक्यातील कलमठ महाजनी नगर, कलेश्वरनगर, लांजेवाडी आणि वरवडे फणसनगर भागात मंगळवारी पाणी घुसल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली होती.
मंगळवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून कणकवली शहर व लगतच्या परिसरात तर सायंकाळी ४ वाजल्यापासून तालुक्यातील अन्य भागात मुसळधार पाऊस पडला. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत जोरदार बरसणाऱ्या पावसाने गडनदी तसेच जानवली नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली होती.
सह्याद्री पट्ट्यात मंगळवारी पडलेल्या धुवाँधार पावसाने जानवली नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली होती. त्यामुळे मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास जानवली नदीलगतच्या कलमठ महाजनीनगर आणि कलेश्वरनगर भागात पाणी घुसले होते. या परिसरातील काही घरांच्या पायऱ्यांपर्यंत पाणी चढले होते. तर गाड्याही पाण्याखाली गेल्या होत्या.
कलमठ लांजेवाडी भागातही पाणी घुसले होते. कांदे व्यापारी थोरबोले यांच्या गाड्या पाण्याखाली गेल्या होत्या. तर वरवडे फणसनगर येथे सेंट उर्सुलानजीक पुलालगत आचरा-कणकवली रस्त्यावरही पाणी आले होते. पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास पाणी ओसरल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
तहसीलदार आर. जे. पवार यांनी स्वत: मध्यरात्री साडेतीन वाजता पुरसदृश भागात जात पाहणी केली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष युवा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी पाण्यात वेढलेल्या गाड्या व सामान बाहेर काढण्यास नागरिकांना मदत केली.
कणकवलीतील जानवली नदीवरील गणपती सान्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. या परिसरातील घरांच्या परिसरात अचानक पाणी आल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, काही वेळाने हे पाणी ओसरले. मंगळवारी तालुक्यातील काही विशिष्ट भागातच जोरदार पाऊस झाल्याने ढगफुटीसदृश वातावरण पहायला मिळाले. बुधवारी दिवसभर ढगाळ वातावरण पहायला मिळाले. मात्र, पाऊस पडला नाही.