कणकवलीला पावसाचा फटका, रामेश्वर प्लाझात पाणी शिरले, लाखो रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 04:33 PM2019-07-02T16:33:25+5:302019-07-02T16:35:51+5:30
कणकवली शहरासह परिसरात गेले दोन दिवस धुवाँधार बरसणाऱ्या पावसाचा फटका नागरिकांना रविवारी बसला. अनेक ठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच महामार्ग ठेकेदाराने चौपदरीकरणाचे काम करताना आवश्यक ती काळजी न घेतल्याने गटारे, नाले तुंबून नागरी वस्तीत पाणी साचत आहे.
कणकवली : कणकवली शहरासह परिसरात गेले दोन दिवस धुवाँधार बरसणाऱ्या पावसाचा फटका नागरिकांना रविवारी बसला. अनेक ठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले असून नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच महामार्ग ठेकेदाराने चौपदरीकरणाचे काम करताना आवश्यक ती काळजी न घेतल्याने गटारे, नाले तुंबून नागरी वस्तीत पाणी साचत आहे.
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करीत असताना ठेकेदार कंपनीकडून अॅड. उमेश सावंत यांच्या निवासस्थानाजवळील नाल्याचे काम अपूर्ण ठेवण्यात आले आहे. त्यातच हॉटेल गोकुळधामच्या बाजूने पाणी विसर्गासाठी असलेला पाईपदेखील मातीच्या भरावामुळे बंद झाला होता. त्यामुळे पावसाचे पाणी रामेश्वर प्लाझामधील सारस्वत बँकेसह तेथील अनेक दुकानांमध्ये घुसले. तेथील निवासी संकुलाजवळील ४ चारचाकी गाड्या तसेच १२ दुचाकी आणि तीन विहिरी रविवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पाण्याखाली गेल्या होत्या.
या परिसरात पाणी भरताच संबंधित ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांशी नागरिकानी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता भ्रमणध्वनी बंद अथवा नॉटरिचेबल असल्याचा संदेश मिळत होता. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक रोखली. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यावेळी पोलिसांची तारांबळ उडाली. वाहतूक पोलीस प्रकाश गवस, भूषण सुतार आदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांची समजूत काढत वाहतूक सुरळीत केली.
पावसाचे पाणी ठिकठिकाणी साचले होते. कणकवलीतील अनेक घरांमध्ये पाणी घुसले. याबाबत माहिती समजताच पाण्याचा विसर्ग करण्यासाठी सकाळपासूनच नगरसेवक अबिद नाईक, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, माजी जिल्हा परिषद सदस्या सुगंधा दळवी, नगरसेविका मेघा गांगण, विराज भोसले, सुशांत दळवी, संजय मालंडकर, संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री, अण्णा कोदे, प्रदीप मांजरेकर, राजू राठोड , सचिन सावंत, मिथुन ठाणेकर, बंडू गांगण, सुशील पारकर, अरुण चव्हाण, शामसुंदर दळवी, अभय राणे, बच्चू प्रभुगावकर यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रयत्न केले.
महामार्ग ठेकेदाराच्या अनास्थेचा फटका
कणकवलीत नाले, गटारे, मोऱ्या यांचे काम व्यवस्थित न केल्यामुळे कणकवली तुंबणार हे निश्चितच होते. त्याची प्रचिती पुन्हा एकदा रविवारी कणकवलीवासीयांना आली. महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी व ठेकेदाराच्या अनास्थेमुळेच कणकवली पहिल्याच पावसात पाण्याखाली गेली. ही पावसाची सुरुवात असताना अनेक ठिकाणी घातलेला मातीचा भराव खचला आहे.
उबाळे मेडिकलसमोरील नालादेखील दोन्ही बाजूंनी खचत चालला आहे. अॅड. उमेश सावंत यांच्या घराशेजारील नाल्याचे काम व्यवस्थितरित्या करावे यासाठी लोकप्रतिनिधी आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अनेकवेळा आवाज उठविला होता़ तरीसुध्दा दिलीप बिल्डकॉनच्या मुजोर अधिकाऱ्यांनी चालढकलपणा केला आहे. त्यामुळे कणकवलीकरांची लाखो रूपयांची हानी झाली आहे.
तहसीलदारांनी दिले पंचनाम्याचे आदेश!
कणकवली शहरात घरे, दुकाने, विहिरी, गाड्यांचे नुकसान पावसाच्या पाण्याने झाल्याने प्रभारी तहसीलदार आर. जे. पवार यांनी स्वत: सकाळपासूनच घटनास्थळी उपस्थिती दर्शविली. तलाठी अजय परब तसेच महसूलच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. नागरिकांचे झालेले नुकसान पाहून तहसीलदार आर. जे. पवार यांनी नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्याचे आदेश तलाठी, मंडल अधिकाºयांना दिले. तसेच संबंधित ठेकेदाराच्या कामाबाबत तहसीलदारांनी यावेळी नाराजी व्यक्त केली.
नदी, नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ !
धुवाँधार पावसाने नदी, नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. गडनदी, जानवली नदी यांच्या पाण्याची पातळी वाढली असून कनकनगर तसेच मराठा मंडळ येथील बंधाऱ्यांवरूनही काही काळ पाणी वाहत असल्याने तेथील मार्ग वाहतुकीसाठी बंद झाले होते. तेथील पाण्याच्या प्रवाहाचे दृश्य बघण्यासाठी तसेच आपल्या भ्रमणध्वनीच्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी अनेक नागरिकांनी हजेरी लावली होती. त्यात तरुणाईचे प्रमाण जास्त होते.
विजेचा लपंडाव दिवसभर सुरूच!
एकीकडे जोरदार पाऊस पडत असतानाच कणकवलीसह परिसरात रविवारी दिवभर विजेचा लपंडाव अधूनमधून सुरू होता. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. रविवारची सुटी असल्याने शासकीय कार्यालये तसेच खासगी आस्थापने, बँका बंद होत्या. त्यामुळे त्यांना वीज प्रवाह खंडित होण्याचा फटका बसला नाही.