कणकवलीत पावसाचा जोर
By admin | Published: July 10, 2016 11:48 PM2016-07-10T23:48:20+5:302016-07-10T23:48:20+5:30
नदी, ओहोळांना पाणी : कसालजवळ झाडाची फांदी पडून वाहतूक ठप्प
कणकवली : कणकवली शहरासह तालुक्यात शनिवारी मध्यरात्रीपासून पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तालुक्यातील अनेक नद्या तसेच ओहोळांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. खारेपाटण येथील शुकनदीने पूर्णत: धोक्याची पातळी ओलांडली असून पुराचे पाणी खारेपाटणमध्ये घुसल्यामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.
दरम्यान, तालुक्यात तुरळक घटना वगळता पावसामुळे कोठेही मोठी हानी झाल्याची नोंद येथील तहसील कार्यालयात सायंकाळी उशिरापर्यंत झालेली नव्हती.
तालुक्यात रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंच्या २४ तासात ६८ मिमी. पाऊस झाला होता. आतापर्यंत तालुक्यात १६०५ मिमी पाऊस झाला आहे. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. तर पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. त्यामुळे सायंकाळी ५ वाजेपर्यंच्या पावसाची मोजणी महसूल विभागाने केली असता, ४८ मिमी. पाऊस झाल्याचे स्पष्ट झाले.
रविवारी दिवसभर जोरदार पाऊस कोसळत असल्यामुळे नदी तसेच ओहेळांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मात्र पावसाच्या पाण्यामुळे रस्ता वाहतुकीस बंद झाल्याची घटना कुठेही घडली नाही. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. मुंबई-गोवा महामार्गावरील कसाल पुलाजवळून हिवाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर आंब्याची मोठी फांदी तुटून पडल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ बंद होती. (वार्ताहर)