मालवण तालुक्यात अधूनमधून पाऊस
By Admin | Published: June 25, 2015 12:56 AM2015-06-25T00:56:22+5:302015-06-25T00:59:22+5:30
वादळाचा जोर : दोन दिवस पाऊण लाखाचे नुकसान
मालवण : गेले दोन दिवस विश्रांती घेतलेल्या वरुणराजाने बुधवारी अधूनमधून मालवणात हजेरी लावली. तर वादळी वाऱ्यामुळे आणि पावसामुळे मालवण तालुक्यात गेल्या दोन दिवसांत एकूण पाऊण लाखाची वित्तहानी झाली आहे.
गेल्या दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने अधूनमधून उपस्थिती दर्शवित मालवणवासियांना झोडपून काढले. पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरी मालवणच्या किनारपट्टी भागात मात्र वादळी वारा आहे.
वादळी वारा आणि पाऊस यांच्यामुळे तालुक्यात पाऊण लाखाची हानी झाली आहे. आंबेरी येथील अंजली गोपाळ गोसावी यांच्या घरावर माड पडून ४० हजार रुपयांचे नुकसान झाले.
वराड कुसरवे येथील एका घराचे छप्पर वादळी वाऱ्याने उडून गेल्याने सुमारे १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. धामापूर येथील रामचंद्र आजगावकर यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून अंशत: नुकसान झाले. तसेच कुसरवे येथील कृष्णा शंकर रावले यांच्या गोठ्याचे छप्पर कोसळले. पोईप येथील सुहासिनी घाडीगावकर यांच्या घराचे पत्रे उडून गेले तर याच गावातील लक्ष्मी विठ्ठल जंगले यांच्या घरावरील पत्रे वादळी वारा व पावसाने उडून गेल्याची घटना घडली आहे. बुधवारी मालवण तालुक्यात ११ मि. मी. एवढा पाऊस पडला. (प्रतिनिधी)