पावसाचा जोर कायम
By admin | Published: July 14, 2016 12:21 AM2016-07-14T00:21:52+5:302016-07-14T00:32:18+5:30
पीठढवळ नदीला पूर : चार तासांनी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक सुरळीत
ओरोस : मंगळवारी रात्री उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम राहिल्याने ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मुंबई-गोवा महामार्गावरील ओरोस पीठढवळ नदीला पूर आला. पुराचे पाणी महामार्गावर आल्याने महामार्ग सुमारे चार तास ठप्प झाला होता. त्यामुळे महामार्गावर वाहनांची रांगच रांग लागली होती.
या पावसाळी हंगामात पहिल्यांदाच महामार्गावर पाणी आल्याने महामार्ग वाहतूक पोलिसांची दमछाक उडाली. पोलिसांनी रात्री ११ वाजता वाहतूक ओरोसमार्गे कसाल, कट्टा, पेंडूरमार्गे कुडाळकडे, तर कुडाळ-अणावमार्गे ओरोस कणकवलीकडे वळविली. त्यामुळे तब्बल चार तासांनी महामार्ग सुरळीत करण्यात आला.
रविवारपासून तीन दिवस मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले असून, अनेक ठिकाणी नुकसानही झाले आहे. ठिकठिकाणी पूर येऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. तसेच अवघ्या दीड महिन्यात निम्म्यापेक्षा जास्त पाण्याची सरासरी पावसाने गाठली आहे. मंगळवारी सकाळपासून सुरू झालेला पाऊस रौद्र रूप धारण करीत रात्री उशिरापर्यंत धो-धो कोसळला. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. रात्री १० च्या सुमारास महामार्गावरील पीठढवळ पुलावर पुराचे पाणी आल्याने महामार्ग तीन तास ठप्प झाला होता. महामार्गावर पाच फूट उंचावरून पाणी वाहत होते. त्यामुळे गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पाणी ओसरायला जवळजवळ चार तास लागले. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी येऊन परिस्थितीचा आढावा घेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. ओरोस, सुकळवाड-कट्टामार्गे कुडाळच्या दिशेने, तर कुडाळ, अणाव, धामापूरमार्गे कसाल, कणकवलीच्या दिशेने वाहतूक वळविल्याने थोड्या प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली; परंतु अवजड वाहनांचे पुराचे पाणी ओसरल्यानंतर मार्गक्रमण झाले. (वार्ताहर)
महामार्गावर पहिल्यांदाच पाणी
यावर्षीच्या पावसाळी हंगामात पहिल्यांदाच महामार्ग पार करून जाणाऱ्या पीठढवळ नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने महामार्गावर पाणी आले होते. महामार्गावरून तब्बल पाच फूट उंचावरून पाणी जात होते. या नदीने अक्राळविक्राळ रूप धारण केले होते. गतवर्षी या नदीला एकदाही पूर आला नव्हता.
जिल्ह्यातील २४ तासांतील पाऊस पुढीलप्रमाणे : दोडमार्ग ११४ मि.मी., सावंतवाडी ९०, वेंगुर्ला ५८, कुडाळ ६६, मालवण ६४, कणकवली १११, देवगड ४२, वैभववाडी १५५ अशी नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ८७.५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
आपत्ती नियंत्रण कक्ष नावापुरताच
पावसाळी हंगामात जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती उद्भवल्याची माहिती तत्काळ प्रशासनास मिळावी, यासाठी जिल्हा व प्रत्येक तालुकास्तरावर आपत्ती नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, या पावसाळी हंगामात नैसर्गिक आपत्तीमध्ये घडलेल्या गंभीर घटनांची नोंदही जिल्हास्तरीय आपत्ती नियंत्रण कक्षात येत नाही. मंगळवारी महामार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास खोळंबली होती. या घटनेची साधी नोंदही या कक्षाकडे नसल्याने हा कक्ष केवळ नावापुरताच मर्यादित राहिला आहे.