सिंधुदुर्गात पावसाचा हाहाकार; अनेक वाहने, साकव गेले वाहून 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 08:31 PM2017-10-16T20:31:54+5:302017-10-16T20:32:16+5:30

जिल्ह्याच्या विविध भागात रविवारी रात्री ढगफुटीसदृश झालेल्या पावसाने हाहाकार माजविला. माणगाव खो-यात शिवापूर ते आंबेरी दरम्यान पुरस्थिती निर्माण झाली होती.

Rainfall of rain in Sindhudurg; Many vehicles, the cargo has gone | सिंधुदुर्गात पावसाचा हाहाकार; अनेक वाहने, साकव गेले वाहून 

सिंधुदुर्गात पावसाचा हाहाकार; अनेक वाहने, साकव गेले वाहून 

Next

सिंधुदुर्ग : जिल्ह्याच्या विविध भागात रविवारी रात्री ढगफुटीसदृश झालेल्या पावसाने हाहाकार माजविला. माणगाव खो-यात शिवापूर ते आंबेरी दरम्यान पुरस्थिती निर्माण झाली होती. तर वैभववाडी तालुक्यात सुकनदीच्या पुरात सांगुळवाडी येथील लोखंडी साकवासह चार दुचाकी आणि एक रिक्षा वाहून गेली. त्यापैकी रिक्षा अद्याप सापडलेली नाही. गडमठमध्ये पुराच्या पाण्यात वाहून जाणा-या कासार्डे-साटमवाडी येथील दामू साटम (६९) या वृद्धाला लोरेतील सुरेंद्र पेडणेकर या युवकाने पुरात उडी मारून वाचविले.माणगाव खो-यात रविवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने शिवापूर ते आंबेरीपर्यंत पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे अनेक  घरात, दुकानात पाणी घुसून शेती वाहून गेल्याने नुकसान झाले. 

वैभववाडी तालुक्यात रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरश: दाणादाण उडवून दिली. सुकनदीच्या पुरात सांगुळवाडी येथील लोखंडी साकवासह चार दुचाकी आणि एक रिक्षा वाहून गेली. त्यापैकी रिक्षा अद्याप सापडलेली नाही. मांगवली नरसाळेवाडीतील मंगेश राणे यांची नारळबाग पुराच्या लोंढ्यात उद्ध्वस्त झाली आहे. तर तालुक्यातील नदीकाठची शेकडो हेक्टर भातशेती पुराच्या गाळात गाडली गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

वाहून जाणा-या कासार्डेतील वृद्धाला वाचवले
कासार्डे साटमवाडी येथील दामू साटम (६९) रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास गडमठ साटमवाडी पुलावरुन निघाले होते. त्याचवेळी आलेल्या पुराच्या लोंढ्या सोबत ते पुलावर वाहत जावू लागले. त्यामुळे साटम यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी जवळच असलेले लोरेतील सुरेंद्र ऊर्फ बाळू पेडणेकर यांनी पाण्यात उडी टाकून काही अंतर वाहत गेलेल्या साटम यांना पाण्याबाहेर काढून जीवदान दिले. पेडणेकर हे दामू साटम यांच्या कुटुंबासाठी देवदूत ठरले. पेडणेकर यांनी अंधुक प्रकाशात पुरात उडी मारून वृद्धाला वाचविल्याबद्दल त्यांच्या साहसाचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे. 

निळेलीत साकव वाहून गेला
माणगाव खो-यात शनिवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे निळेली-देऊळवाडा येथील ओहोळावर ग्रामस्थांनी श्रमदानातून बांधलेला साकव वाहून  गेला. निळेली-देऊळवाडीतील ग्रामस्थ तेथील ओहोळावर दरवर्षी श्रमदानातून साकव बांधतात. शाळेत जाणारी मुले तसेच ग्रामस्थांचीही त्याठिकाणी पावसाळ्यात ये-जा करावी लागते. पावसाळ्यात ग्रामस्थांसाठी हाच मार्ग सोयीस्कर ठरतो. शनिवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे हा साकव वाहून गेला. त्यामुळे याठिकाणी कायमस्वरूपी लोखडी साकव बांधून मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. 
 

Web Title: Rainfall of rain in Sindhudurg; Many vehicles, the cargo has gone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस