‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाबाबत राज ठाकरेंनी मांडली आपली भूमिका, म्हणाले..
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 04:23 PM2022-12-02T16:23:58+5:302022-12-02T16:24:28+5:30
जातीपलीकडे जाऊन इतिहास पाहणे गरजेचे
कुडाळ : ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मोठे वक्तव्य केले आहे. या चित्रपटावरून सध्या सर्वत्र वाद सुरू आहे. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातही चुकीचा इतिहास दाखवला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी या चित्रपटातील ऐतिहासिक तथ्यांबाबत झालेल्या वादावर भाष्य केले आहे. राज ठाकरे म्हणाले, याबाबत मी इतिहासकार जयसिंगराव पवार यांच्याशी बोललो. त्यांनी गजानन मेहंदळे म्हणतात ते खरे असल्याचे सांगितले, अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली.
ते सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. त्यांनी गुरुवारी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज ठाकरे म्हणाले, जातीपलीकडे जाऊन इतिहास पाहणे गरजेचे आहे. सध्या जातीतून इतिहास पाहण्याचे पेव फुटले आहे. ठरावीक मूठभर लोकच असे करत आहेत. त्यात त्यांचा राजकीय स्वार्थ आहे.
“छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले तर मुस्लीम मते जातात म्हणून राष्ट्रवादी शिवरायांचे नाव घेत नसे. म्हणून मग राष्ट्रवादीला हवा तसा शिवरायांचा इतिहास सांगण्यासाठी काही टोळ्या उभ्या करायच्या आणि त्यावर मग राजकारण करायचे,” असेही राज ठाकरे म्हणाले.
तेव्हा मी तज्ज्ञ मंडळींशी बोलतो
‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या कार्यक्रमात मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होतो. मात्र, मला जेव्हा इतिहासाबद्दल कुतूहल वाटते तेव्हा मी तज्ज्ञ मंडळींशी बोलतो. आपण त्यांच्याशी बोलले पाहिजे, समजून घेतले पाहिजे, असे मतही त्यांनी यावेळी मांडले.
मी यावर पवार यांच्याशीही बोललो
राज ठाकरे पुढे म्हणाले, मध्यंतरी मी गजानन मेहंदळे यांना भेटलो. मी त्यांना विचारले की, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’बाबत कोणी ही सहा नावे सांगत आहे तर कोणी ती नावे सांगत आहेत.. तुमचे म्हणणे काय? मी यावर पवार यांच्याशी बोललो. ते मला म्हणाले की, गजाननराव बरोबर बोलत आहेत.