राज ठाकरेंनी उलगडला स्वत:तील व्यंगचित्रकार

By admin | Published: June 28, 2015 11:10 PM2015-06-28T23:10:51+5:302015-06-29T00:24:26+5:30

कलेकडे लक्ष द्या : ‘बांदेकर फाईन आटर््स’च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Raj Thackeray's self-illustrated cartoonist | राज ठाकरेंनी उलगडला स्वत:तील व्यंगचित्रकार

राज ठाकरेंनी उलगडला स्वत:तील व्यंगचित्रकार

Next

सावंतवाडी : मी काही पारंपरिक राजकारणी नाही. अपघातानेच राजकारणात आलो आहे. ठाकरे घराण्याच्या उपजत कला ही व्यंग चित्रकला असून प्रत्येकाने आपल्या परीने कलेकडे लक्ष द्यावे. तरच बदलते जग आपणास दिसू शकेल, असा खास मोलाचा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. राज यांनी आपल्यातील व्यंगचित्रकार बांदेकर फाईन आटर्सच्या मुलांसमोर उलगडत त्यांना मार्गदर्शन केले. प्रोफेसर राज ठाकरे यांनी तब्बल अर्धा तास या मुलांची जणू शिकवणीच घेतली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे शनिवारी सायंकाळी उशिरा सावंतवाडीत दाखल झाले. त्यानंतर रविवारी सकाळी त्यांचे सावंतवाडीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. यानंतर राज यांनी बांदेकर फाईन आटर्स कॉलेजला भेट दिली. यावेळी गुरुप्रसाद रेगे, अनिल शिदोरे, मनसे कोकण संघटक अध्यक्ष तथा माजी आमदार परशुराम उपरकर, सौरभ करंदीकर, विलास राजम, महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप धोपेश्वरकर, अध्यक्ष रमेश भाट, सिध्देश नेरूरकर, संतोष मोरजकर, तुळशीदास नाईक, समीर केरकर आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी चांगले काम केल्याचे चित्रांमधून दिसत आहे. पण यामध्ये बदल असणे आवश्यक आहे. चित्र काढतेवेळी मोकळेपणा हवा. स्टाईलच्या भानगडीत पडू नका. समोर दिसेल, त्याचे चित्र काढा. जग बदलत चाललंय. बदलत्या जगाप्रमाणे पुढे जा. त्याच्या गरजा काय आहेत, हे लक्षात घेऊनच काम करा आणि यशस्वी व्हा, असे सांगून कोकण दौऱ्यामागचे कारण म्हणजे, भविष्यात कोकणासाठी काहीतरी करायचे आहे. यासाठी सर्व स्थळे केंद्रीत करीत असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
चित्रकलेची शेवटची पायरी म्हणजे व्यंगचित्रकारिता आहे. त्याआधी जगात काय चाललंय ते तपासा. बाहेर गेल्यावर गोंधळून जाऊ नका. सर्व गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत. तरच तुम्ही शेवटच्या कलेच्या शेवटच्या पायरीपर्यंत पोहोचाल, असे ठाकरे यांनी सांगितले.
आम्ही राजकारणात आलो ते पारंपरिक राजकारणी म्हणून आलो नाही. पण आमची कला मात्र उपजत आहे. ठाकरे घराणे कलाप्रेमी असून दिसेल त्याचे व्यंगचित्र काढू शकतो. आमची कला व्यंगचित्रात दडली आहे, असे यावेळी त्यांनी सांगितले.
बांदेकर आर्टस्च्या विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत राज यांनी आपला व्यंगचित्रकार त्यांच्या समोर उलगडला.
तसेच मुलांनी काढलेल्या चित्रावर आपली प्रतिकिया देत प्रत्येक विद्यार्थ्याला तुझे चित्र कसे चांगले आहे, तसेच त्यात कोणते बदल केले गेले पाहिजे, याचे ज्ञानही दिले. एका मोठ्या कलाकाराने चक्क आम्हाला कलेचे धडे दिले हे बघून विद्यार्थी चांगलेच भारावून गेले होते.
काही काळासाठी का होईना, राजकारण विसरून राज ठाकरे प्रोफेसर राज ठाकरे म्हणूनच महाविद्यालयात अवतरले होते. तब्बल अर्धातास ते महाविद्यालयात विद्यार्थ्यांसोबत होते. त्यांना महाविद्यालयाच्यावतीने खास भेटवस्तू देण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: Raj Thackeray's self-illustrated cartoonist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.