राजन साळवी रुग्णालयात, प्रकृती स्थिर
By admin | Published: August 13, 2016 10:28 PM2016-08-13T22:28:17+5:302016-08-14T00:27:44+5:30
कोल्हापूरला हलविले :मुंबईतही केल्या होत्या तपासण्या
रत्नागिरी : राजापूरचे आमदार राजन साळवी यांना शनिवारी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात तत्काळ प्राथमिक उपचार मिळाल्यामुळे त्यांची प्रकृती स्थिर आहे. अधिक तपासण्यांसाठी त्यांना कोल्हापूरला हलविण्यात आले आहे.
आमदार साळवी यांना सकाळपासूनच काहीसे अस्वस्थ वाटत होते. हाताला सारख्या मुंग्या येत होत्या. त्यामुळे सकाळी आठ वाजण्यापूर्वीच ते एका खासगी रुग्णालयात गेले. तेथील डॉक्टरनी त्यांचा ईसीजी काढला. मात्र, तो निर्दोष असल्याचे संबंधित डॉक्टर्सनी सांगितले. त्यामुळे साळवी यांनी ८.३0 वाजल्यापासून आपला नियमित दिनक्रम सुरू केला. शनिवारी खासदार विनायक राऊत रत्नागिरीमध्ये होते. त्यामुळे आमदार साळवी विश्रामगृहात गेले. खासदार राऊत यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता समितीची बैठक होती. तेथेही साळवी उपस्थित होते.
दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास साळवी यांना पुन्हा त्रास जाणवू लागला. त्यांची स्थिती लक्षात घेऊन त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्याची तयारी केली. मात्र, तज्ज्ञ डॉक्टर शनिवारी रत्नागिरीत उपलब्ध नसल्याने कार्डियॅक अॅम्ब्युलन्सने त्यांना कोल्हापूरला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. साडेतीन वाजण्याच्या सुमारास ते कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले. मात्र, मारुती मंदिर येथे येईपर्यंत त्यांना खूप घाम येऊ लागला आणि अधिक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना डॉ. संजय लोटलीकर यांच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथेच साळवी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तेथे त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले. त्यामुळे काही वेळातच त्यांची प्रकृती स्थिर झाली.बसलेला धक्का तीव्र असल्याने भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी त्यांना अँजिओग्राफी करण्याचा सल्ला देण्यात आला असून, त्यासाठी त्यांना सायंकाळी साडेसात वाजता कोल्हापूरला नेण्यात आले. (प्रतिनिधी)
मुंबईतही केल्या होत्या तपासण्या
अधिवेशन काळात आमदार साळवी यांनी मुंबईत स्ट्रेस टेस्ट केली. ती ‘नॉर्मल’ आल्याने ते निश्चिंत होते. मात्र अशा तपासण्या काहीवेळा फसव्या ठरतात. शरीरात कोणताही बिघाड झाला नसल्याचे या तपासण्यांमध्ये निदर्शनास आले तरी आणखी चाचण्या गरजेच्या ठरतात.
रुग्णालयासह रस्त्यावरही प्रचंड गर्दी
आमदार साळवी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त सायंकाळी साडेसहा वाजल्यानंतर शहरभर पसरले. त्यामुळे रुग्णालय परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. केवळ रुग्णालयाचा परिसरच नाही, तर बाहेरच्या रस्त्यावरही असंख्य लोक जमा झाले होते.