राजन तेलींच्या मुलावर हल्ला
By Admin | Published: January 18, 2017 11:57 PM2017-01-18T23:57:44+5:302017-01-18T23:57:44+5:30
दादर रेल्वेस्थानकातील घटना : नीतेश राणे यांच्या विरोधात गुन्हा
मुंबई : भाजपचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांचा मुलगा प्रथमेश याच्यावर दादर स्थानकात मंगळवारी रात्री हल्ला झाला. प्रथमेशने केलेल्या तक्रारीनंतर काँग्रेसचे आमदार तथा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांच्यासह एकूण पाचजणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मध्य रेल्वेच्या दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर कोकणकन्या एक्स्प्रेसच्या ए-१ बोगीत प्रवेश केल्यानंतर प्लॅटफॉर्मवर काही सामान तर राहिले नाही ना हे पाहण्यासाठी प्रथमेश पुन्हा प्लॅटफॉर्मवर उतरला. तेव्हा समोरचउभ्या असलेल्या दोनपैकी एका व्यक्तीने प्रथमेशशी हात मिळवला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. दुसऱ्यानेही मारहाण केली. त्यातील एकाने ‘गाडीखाली ढकलून दे’, अशी धमकीही दिली. प्रथमेशने मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर त्याचे दोन भाऊ मदतीला आले. त्यानंतर दोघे पळू लागले. त्यातील एकाला ‘आरपीएफ’च्या जवानाने पकडले.
घटनेनंतर प्रथमेशने दादर लोहमार्ग पोलिसांत नीतेश राणे यांच्यासह एकूण पाचजणांविरोधात केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रणीत खरात याला अटक करण्यात आली असून, त्याचे तीन साथीदार आकाश साळवी, विनीत गायकवाड, मोहित गरुड यांचा शोध घेण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा राजन तेली आणि त्यांच्या कुटुंबाला चांगलाच ओळखून आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांवर काही प्रतिक्रिया न देणे, हेच बरे आहे.
- नीतेश राणे,
आमदार
प्रथमेश तेली यास मारहाण करणाऱ्यांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे, तर अन्य तीनजणांचा शोध सुरू आहे. या प्रकरणात नीतेश राणे यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपासानंतरच पुढील कार्यवाही केली जाईल.
- निकेत कौशिक,
लोहमार्ग-पोलिस आयुक्त