राजन वराडकर- गणेश कुशेंचे उपोषण सुरूच, तब्येत खालावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 05:12 PM2021-04-07T17:12:11+5:302021-04-07T17:31:29+5:30
नगरपरिषद समोर उपनगराध्यक्ष राजन वराडकर व गटनेते गणेश कुशे यांनी छेडलेले उपोषण दुसऱ्या दिवशी सुरू राहिले. मंगळवारी सकाळी नगरसेवक गणेश कुशे यांची तब्येत काहीशी बिघडली तर सायंकाळी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांचीही तब्येत खालावली.
मालवण : नगरपरिषद समोर उपनगराध्यक्ष राजन वराडकर व गटनेते गणेश कुशे यांनी छेडलेले उपोषण दुसऱ्या दिवशी सुरू राहिले. मंगळवारी सकाळी नगरसेवक गणेश कुशे यांची तब्येत काहीशी बिघडली तर सायंकाळी उपनगराध्यक्ष राजन वराडकर यांचीही तब्येत खालावली.
दरम्यान, वराडकर यांची वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्यांना रुग्णालयात दाखल होण्यास सांगितले असता वराडकर यांनी नकार दिला. आम्ही मालवण नगरपरिषदेच्या मनमानी गैरकारभाराबाबत छेडलेले उपोषण हे सुरूच ठेवणार असल्याचे कुशे व वराडकर यांनी स्पष्ट केले.
मालवण नगरपरिषद भाजी मार्केट गाळा क्रमांक १ (१) तत्काळ खाली करून तो पाडावा. सुजाता उमेश केणी यांना स्वतंत्र वीज मीटर घेण्याकरिता स्वतंत्र घर नंबर घेण्यात यावा. स्विमिंग पूल व ट्रेंनिग सेंटर बाबतचे कृ. सी. दे. शिक्षण संस्थेने दिलेले पत्र जाणीवपूर्वक गहाळ केले गेले, ते पत्र संस्थेकडून मागून नमूद मुद्यांचा विचार करून त्याप्रमाणे कार्यवाही व्हावी, सफाई कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार तत्काळ देण्यात यावेत, भुयारी गटार योजनेच्या ठेकेदाराने वेळोवेळी मुदतवाढ घेऊनही काम पूर्ण करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केलेली आहे. त्यावर कडक कारवाई करून त्यास काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच त्याने सादर केलेली कोणतीही देयके अदा करण्यात येऊ नये, या प्रमुख मागण्या उपोषणकर्ते वराडकर व कुशे यांच्या आहेत. त्यासाठी ते उपोषणाला बसले आहेत.
नागरिकांचा उपोषणाला पाठींबा
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी प्रशासन अथवा सत्ताधारी कोणीही उपोषणस्थळी येण्याची तत्परता दाखवली नाही. किंबहुना आम्ही उपस्थित केलेले मागणी मुद्दे योग्यच आहे हे त्यांना माहिती असल्याने प्रशासन अथवा सत्ताधारी यांची उपोषणस्थळी सामोरे येण्याची धमक नाही, असे वराडकर यांनी सांगितले. जनतेने आमच्या उपोषणस्थळी भेटी दिल्या. उपोषणाचे मुद्दे योग्य असल्याचे नागरिकांनी सांगत अनेकांनी लेखी स्वरूपात आमच्या उपोषणास पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले आहे, असे वराडकर व कुशे यांनी सांगितले.