राजापूर नगराध्यक्षांचा जातीचा दाखला अवैध

By Admin | Published: May 24, 2017 11:22 PM2017-05-24T23:22:06+5:302017-05-24T23:22:06+5:30

राजापूर नगराध्यक्षांचा जातीचा दाखला अवैध

Rajapur Municipal Chief's Caste Certificate is invalid | राजापूर नगराध्यक्षांचा जातीचा दाखला अवैध

राजापूर नगराध्यक्षांचा जातीचा दाखला अवैध

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : काँग्रेसचे नगराध्यक्ष हनीफ मुसा काझी यांनी निवडणुकीदरम्यान सादर केलेला मच्छिमार दालदी समाजाचा दाखला जिल्हा जात पडताळणी समितीने अवैध ठरविला आहे. पूर्वलक्षी प्रभावाने हा दाखला रद्द करताना तो जप्त करण्यात येत असल्याचे समितीने आपल्या निकालात म्हटले आहे. त्यामुळे हे नगराध्यक्षपद रिक्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक अनिल कुडाळी व नगराध्यक्षपदाचे पराभूत उमेदवार अभय मेळेकर यांनी याप्रकरणी पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. आता काझी न्यायालयात अपील करणार की हे पद रिक्त करण्याचे आदेश दिले जातात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
हनीफ काझी यांनी सादर केलेला मच्छिमार (दालदी) या इतर मागास वर्गाचे प्रमाणपत्र पडताळणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत १९ आॅक्टोबर २०१६ पडताळणी समिती कार्यालयाला प्राप्त झाला होता. हनीफ काझी दि. २८ नोव्हेंबर २०१६ राजापूर नगरपरिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते.
त्यांच्या या जातीच्या दाखल्याबाबत शिवसेनेचे अनिल कुडाळी आणि अभय मेळेकर यांनी जातपडताळणी समितीकडे तक्रार केली होती. सर्व मुद्दे, कागदोपत्री पुरावे, दक्षता पथकाचे अहवाल, हनीफ काझी यांचे विधिज्ञ, तक्रारदार अभय मेळेकर, तक्रारदार अनिल कुडाळी व त्यांचे विधिज्ञ यांनी मांडलेले म्हणणे व युक्तिवाद विचारात घेऊन हनीफ काझी यांचा जातीचा दाखला रद्द करण्यात येत असल्याचा निकाल समितीने दिला आहे. हे निकालपत्र संशोधन अधिकारी सलीमा तडवी यांनी समितीचे सदस्य प्रमोद जाधव व अध्यक्ष दिलीप हळदे यांचे सहमतीने लिहिले आहे. हा दाखला काझी यांना उपविभागीय अधिकारी राजापूर यांनी वितरित केला आहे.
हनीफ काझी यांच्यावर कारवाई व्हावी
या निकालानुसार जातीचा दाखला अवैध ठरल्यास त्याआधारे मिळालेले लाभ काढून घेणे, जातीचे खोटे प्रमाणपत्र सादर करून स्थानिक प्राधिकरणाची, सहकारी संस्थेची किंवा कोणत्याही संविधिक मंडळाची निवडणूक लढवली असेल तर घेतलेले लाभ जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे वसूल करणे आणि अशा व्यक्तीची निवडणूक ही भूतलक्षी प्रभावाने समाप्त झाली असल्याचे मानण्यात येईल. यानुसार हनीफ काझी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी, असे पडताळणी समितीने निकालपत्रात नमूद केले आहे.
काँग्रेसमध्ये खळबळ
रत्नागिरी जिल्ह्यात पाच ठिकाणी झालेल्या थेट नगराध्यक्ष निवडणुकीत राजापुरातच काँग्रेसचा नगराध्यक्ष निवडून आला होता. आता तेच पद अडचणीत आल्यामुळे काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे.
पुढे काय होणार?
१ हनीफ काझी यांचा जातीचा दाखला अवैध ठरवताना संबंधितावर कारवाई करावी, असे पडताळणी समितीने आपल्या निकालात नमूद केले आहे. त्याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे जाईल आणि तेथून पुढील कार्यवाही केली जाईल.
२ हनीफ काझी यांना या निकालाविरोधात न्यायालयाकडे दाद मागण्याची संधी आहे. तेथील निकालानुसार पुढील कार्यवाही केली जाईल.

जिल्हा जातपडताळणी समितीच्या निकालाची प्रत अद्याप माझ्या हाती आलेली नाही. ती प्रत मिळाल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन.
-हनीफ मुसा काझी,
नगराध्यक्ष, राजापूर
जिल्हा जातपडताळणी समितीच्या या निकालाचे मी स्वागत करतो. चुकीच्या पद्धतीने जातीचा दाखला मिळविणाऱ्यांना मिळालेली ही चपराक आहे.
-अभय मेळेकर, शिवसेनेचे तत्कालीन उमेदवार

Web Title: Rajapur Municipal Chief's Caste Certificate is invalid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.