राजापुरात स्वच्छतेची झाडू फिरतेय चक्क ‘व्हॉटस्अॅप’च्या हातांनी!
By admin | Published: December 16, 2014 10:12 PM2014-12-16T22:12:18+5:302014-12-16T23:40:42+5:30
राजापूर शहरातील आपल्या तीन-चार मैत्रिणींना एकत्र करत हे भारत स्वच्छता अभियान यशस्वी करण्यात यश मिळवले.
राजापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत स्वच्छता अभियानाची सुरुवात केली आणि संपूर्ण देशभर स्वच्छतेचा नारा घुमला. सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली. जनतेनेही यात सक्रीय सहभाग दर्शवला. काही दिवसांतच हा ओघ ओसरलादेखील! पण गेले दोन-तीन महिने राजापूर शहरातील सुमारे २० जणांच्या गटाने ही स्वच्छता मोहीम अव्याहतपणे सुरु ठेवली आहे. राजापूरच्या माजी नगराध्यक्ष अपूर्वा मराठे यांच्या पुढाकाराने व्हॉटस्अॅपच्या माध्यमातून एकत्र आलेले हे सर्वजण कचऱ्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे राजापूर शहराची स्वच्छता नियमितपणे सुरु आहे.
राजापूर नगर परिषदेवर निवडून आल्यापासून अपूर्वा मराठे यांनी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवण्यावर भर दिला आहे. नगराध्यक्षपदाच्या काळात त्यांनी प्लास्टिकमुक्त राजापूरसाठी प्रयत्न केला होता. प्लास्टिक मुक्तीचा दापोली पॅटर्न राबवण्यास सुरुवात केली होती. मात्र, त्याच दरम्यान पुन्हा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका आल्यानंतर ही मोहीम थांबली होती. त्यांच्या या मोहिमेला म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही मोहीम थांबली असली तरी त्यांनी आपला स्वच्छतेचा वसा कायम राखला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर स्वच्छता अभियान राबवण्याची घोषणा केली आणि याची गांभीर्याने अंमलबजावणी करण्याचा निर्णय मराठे यांनी घेतला.
याच कालावधीत त्यांनी राजापूर शहरातील आपल्या तीन-चार मैत्रिणींना एकत्र करत हे भारत स्वच्छता अभियान यशस्वी करण्यात यश मिळवले. व्हॉटस्अॅपवर स्वच्छ राजापूर नावाचा ग्रुप तयार करत त्यांनी या आपल्या मोहिमेमध्ये अनेकांना सामील करुन घेतले. शिल्पा मराठे, ताम्हणकर, रुपा केळकर, मुग्धा अभ्यंकर, आ. के. मराठे, गौरी अभ्यंकर, जयंत अभ्यंकर, डॉ. तृप्ती पाध्ये, पराग हर्डीकर, मनोज मराठे, स्मिता अभ्यंकर, अनिरुद्ध रायकर, अनंत रानडे, श्रुती ताम्हणकर आदी सुमारे २० जण या ग्रुपमध्ये आहेत. या ग्रुपचे सर्व सदस्य दर शनिवारी एकत्र येतात व शहरात ज्या ठिकाणी जास्त कचरा आहे तो साफ करण्याचे काम करतात. दर गुरुवारी भरणाऱ्या आठवडा बाजाराच्या दिवशी सर्वजण एकत्र येऊन बाजारातील व्यापाऱ्यांना आपला कचरा एकत्र करुन ठेवण्यास सांगतात.
प्रारंभी व्यापाऱ्यांनी एकत्र करुन ठेवलेला कचरा गुरे व कुत्री विस्कटत असत. मात्र, ही गोष्ट त्यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत नगर परिषद प्रशासनाशी चर्चा करुन दर गुरुवारी नगर परिषदेची कचरा गाडी मागून घेतली आहे. आता व्यापारी संध्याकाळी आपला सर्व कचरा या गाडीमध्ये टाकतात. त्यामुळे आठवडा बाजाराच्या दिवशी मोठ्या प्रमाणात साठणारा कचरा लगेचच उचलला जातो. व्हॉटस्अॅपवर या ग्रुपच्या सदस्यांना वेळोवेळी कचऱ्यासंबंधीची माहिती दिली जाते व कधी कुठे भेटायचे हे सांगितले जाते. कचरा आणि स्वच्छता याशिवाय ग्रुपवर अन्य कोणतीही पोस्ट टाकण्यास अलिखित बंदी आहे, नव्हे; तसा या ग्रुपचा शिरस्ताच आहे आणि तो कोणीही मोडत नाहीत. उगाचच बैठका घेऊन वेळ घालवायचा नाही. चर्चा फक्त व्हॉटस्अॅपवरच करायची आणि कामाला लागायचे, असा नियमच जणू येथे आहे. आपली कौटुंबिक आणि दैनंदिन कामे सांभाळून ग्रुपमधील प्रत्येकजण दररोज स्वच्छतेसाठी किमान तासभर तरी खर्च करतो. त्यामुळे शहराची स्वच्छता सातत्याने सुरु आहे. (प्रतिनिधी)
आठवडाभर सर्व सदस्य शहराची पाहणी करुन कोणकोणत्या ठिकाणी कचरा आहे, याची माहिती नगर परिषदेला देतात. त्याची विल्हेवाट लावण्यावर भर दिला जातो. हा ग्रुप स्वच्छ राजापूर वरच थांबलेला नाही. त्यांनी घराघरात स्वच्छता जागृती मोहीम प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली आहे. कचरा कुंडीत टाकल्यानंतर तो कामगारांनी वेळेवर उचलावा, यासाठी आरोग्य विभागाशी त्या संपर्कात असतात.