Satara Bus Accident : पोलादपूर अपघातात वेंगुर्लेतील तरुणावर काळाचा घाला, जावयाचाही दुर्दैवी अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 05:37 PM2018-07-29T17:37:26+5:302018-07-29T17:38:37+5:30
महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटातील भीषण अपघातात वेंगुर्लेचे मूळ रहिवासी राजाराम गावडे यांचा व वेंगुर्लेचे जावई राजेंद्र्र रिसबुड या दोघांचा दुर्दैवी अंत झाला.
वेंगुर्ले : महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटातील भीषण अपघातात वेंगुर्लेचे मूळ रहिवासी राजाराम गावडे यांचा व वेंगुर्लेचे जावई राजेंद्र्र रिसबुड या दोघांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने वेंगुर्लेवर शोककळा पसरली आहे.
दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे ३४ कर्मचारी सलग दोन दिवस सुटी असल्याने महाबळेश्वर येथे विद्यापीठाच्या बसने सहलीला निघाले होते.
पोलादपूरपासून १५ किलोमीटर अंतरावर सकाळी दहाच्या सुमारास आंबेनळी दरीत बस कोसळून ३३ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत वेंगुर्ले-महाजनवाडी येथील मूळचे रहिवासी असलेले व बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे कार्यरत असलेले राजाराम उर्फ ज्ञानू गावडे (४०) व वेंगुर्ले रामेश्वर मंदिरनजीकचे निवृत्त शिक्षक मोरेश्वर उर्फ भाई वैद्य यांचे जावई राजेंद्र्र रिसबुड (दापोली) यांचा मृत्यू झाला.
राजाराम गावडे यांनी वेंगुर्लेत प्रतिकूल परिस्थितीतही आपले शिक्षण वेंगुर्ले शाळा नं. ३ तसेच वेंगुर्ले हायस्कूल व खर्डेकर महाविद्यालयात पूर्ण केले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ, भावजय, बहीण, भावोजी असा परिवार आहे. तर राजेंद्र्र रिसबुड यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
या दुर्घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र्राचे कर्मचारी दापोली येथे रवाना झाल्याची माहिती केंद्र्राचे संशोधक बी. एन. सावंत यांनी दिली आहे.