राजस्थानच्या पती, पत्नीवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 11:22 AM2019-12-24T11:22:42+5:302019-12-24T11:25:36+5:30
वेगळे दुकान घातल्याच्या रागातून महिलेला मारहाण करून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कुडाळ पानबाजार येथे राहणाऱ्या वासुदेव माली व कांतादेवी माली (मूळ रा. राजस्थान) या पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुडाळ : वेगळे दुकान घातल्याच्या रागातून महिलेला मारहाण करून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कुडाळ पानबाजार येथे राहणाऱ्या वासुदेव माली व कांतादेवी माली (मूळ रा. राजस्थान) या पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वासुदेव माली हे राजस्थान येथील असून सुमारे पाच वर्षांपूर्वी त्यांनी कुडाळ बाजारपेठेत कपडे विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्यांच्या दुकानात राजस्थानातील त्यांच्याच गावातील लक्ष्मण माली हे कामाला होते. गेल्या पाच महिन्यांपूर्वी लक्ष्मण माली यांनी कुडाळ पान बाजार येथे स्वतंत्र दुकान सुरू केले असून हे दुकान घातल्यावरून वासुदेव व त्यांची पत्नी कांतादेवी हे दोघेही गेले काही दिवस लक्ष्मण व त्यांच्या पत्नीशी वादविवाद करीत होते.
याच वाद-विवादावरून रविवारी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण माली हे राहत असलेल्या भाड्याच्या घरात खोलीत वासुदेव व त्यांची पत्नी यांनी लक्ष्मण माली यांची पत्नी ललिता हिला शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच जीवे मारण्याचीही धमकी दिली.
यावेळी लक्ष्मण हे दुकानात होते. यावेळी ललिता हिने त्यांना संपर्क करण्याचा मोबाईलवर प्रयत्न केला. त्यावेळी या दोघांनी तिचा मोबाईल हिसकावून घेतला, अशी तक्रार पोलीस ठाण्यात ललिता हिने दिली आहे. ललिता हिच्या तक्रारीनुसार वासुदेव माली व कांतादेवी माली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास कुडाळ पोलीस करीत आहेत.