वारकरी संप्रदायाचे एसटी प्रशासनाच्या विरोधातील आंदोलन तूर्तास स्थगित :राजू राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 05:31 PM2019-02-04T17:31:06+5:302019-02-04T17:32:58+5:30
कणकवली: सिंधुदुर्गातुन पंढरपूर येथे माघी वारीतून जाणाऱ्यांमध्ये अनेक जेष्ठ नागरीक (वारकरी) असतात .जेष्ठ नागरिकांना ५०% आरक्षण असताना जिल्ह्यातील एसटीच्या ...
कणकवली: सिंधुदुर्गातुन पंढरपूर येथे माघी वारीतून जाणाऱ्यांमध्ये अनेक जेष्ठ नागरीक (वारकरी) असतात .जेष्ठ नागरिकांना ५०% आरक्षण असताना जिल्ह्यातील एसटीच्या अधिकाऱ्यांनी एका गाडीमध्ये फक्त ११ जेष्ठ नागरिकाना (वारकरी) यावर्षी आरक्षण देणार व ३० फुल सीटचे आरक्षण केलात तर गाडी बुकिंग करू असे जाहीर केले होते. यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करीत सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाच्यावतीने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र, तुर्तास हे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती राजू राणे यांनी दिली.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हजारो वारकरी पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी माघी वारीतून जातात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जेष्ठ नागरीक (वारकरी) असतात. त्यांना सवलत नाकारल्याने १फेब्रुवारी रोजी आंदोलन करण्याचे वारकरी संप्रदायाच्या वतीने जाहीर केले होते. या आंदोलनाला सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दूरध्वनी वरून पाठिंबा दिला होता.
त्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. तसेच एस टी. सिंधुदुर्ग विभाग नियंत्रकांनी आम्हाला चर्चेला बोलविले होते. त्यांच्याशी झालेल्या चर्चेअंती प्रत्येक बुकींग होणाऱ्या गाडीमध्ये २४ फुल व २० जेष्ठ नागरिक असे बुकिंग दिले जाईल. तसेच एखाद्या ठिकाणी एक,दोन जादा जेष्ठ वारकरी असतील तर संबधित आगार व्यवस्थापकांनी आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा, असे ठरले.वारकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच वारकऱ्यांना बुकींग करतेवेळी काही अडचण आल्यास संबंधितांनी जिल्हा वाहतूक शाखेशी संपर्क साधावा.असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत चर्चेच्या वेळी सर्व आगार व्यवस्थापक यांना मोबाईल वरुन व्हाईस मेसेज करून ,तत्काळ आदेश देण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ , वाहतूक शाखेचे अभिजित पाटील,सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे सचिव राजू राणे, युवासेना जिल्हा समन्वयक राजू राठोड तसेच एसटीचे सर्व अधिकारी व वारकरी उपस्थित होते. याबाबत खासदार विनायक राऊत यांनीही फोन करून विभाग नियंत्रक यांच्या बरोबर यावेळी चर्चा केली.
त्यामुळे अगोदर जाहीर केलेले १ फेब्रुवारी रोजीचे वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात येत आहे.
या आंदोलनासाठी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला व संबंधित अधिकारी यांनी जे सहकार्य केले त्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग च्या वतीने आम्ही आभार मानत आहोत.असेही या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.