राजापूर तालुक्यात नाणार येथे होणारा ग्रीन रिफायनरी पर्यावरणाला बाधक नाही : प्रमोद जठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 18:25 IST2017-12-09T18:19:56+5:302017-12-09T18:25:46+5:30
गिर्ये-रामेश्वर येथे जागतिक दर्जाचे बंदर होणार असून त्यासाठी त्याठिकाणी जमीन हस्तांतरित करण्यासाठी शासनाने नोटीस काढलेली आहे. ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा राजापूर तालुक्यात नाणार येथे होणार असून हा प्रकल्प पर्यावरणाला बाधक ठरणारा नसल्याची माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली. देवगड पंचायत समितीमधील सभापतींच्या दालनामध्ये पंचायत समितीच्या विकासकामांच्या पाठपुरावा बैठकीच्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

देवगड पंचायत समितीमधील सभापतींच्या दालनात पंचायत समितीची प्रलंबित विकासाची कामे माजी आमदार प्रमोद जठार यांनी जाणून घेतली. यावेळी सभापती जयश्री आडिवरेकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब आदी उपस्थित होते.
देवगड : गिर्ये-रामेश्वर येथे जागतिक दर्जाचे बंदर होणार असून त्यासाठी त्याठिकाणी जमीन हस्तांतरित करण्यासाठी शासनाने नोटीस काढलेली आहे. ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा राजापूर तालुक्यात नाणार येथे होणार असून हा प्रकल्प पर्यावरणाला बाधक ठरणारा नसल्याची माहिती माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली. देवगड पंचायत समितीमधील सभापतींच्या दालनामध्ये पंचायत समितीच्या विकासकामांच्या पाठपुरावा बैठकीच्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
देवगड पंचायत समितीमधील सभापती जयश्री आडिवरेकर यांच्या दालनामध्ये माजी आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पंचायत समितीच्या समस्या जाणून घेऊन त्यांचे निराकरण शासन स्तरावरती करण्यासाठी विकासकामांच्या पाठपुरावा बैठकीचे आयोजन केले होते.
यावेळी सभापती जयश्री आडिवरेकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहाय्यक गटविकास अधिकारी शारदा नाडेकर, संतोष किंजवडेकर, जयदेव कदम, पंचायत समिती सदस्य रवींद्र तिर्लोटकर, सदाशिव ओगले, सुनील पारकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर व पंचायत समितीच्या सर्व खात्यांचे खातेप्रमुख उपस्थित होते.
भाजपाचे महाराष्ट्रामध्ये सरकार असून यामुळे आपण पंचायत समितीमध्ये प्रलंबित राहिलेल्या कामांची माहिती घेऊन हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्या त्या खात्याच्या मंत्रिमहोदयांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न करणार असल्याचे जठार यांनी सांगितले. शिक्षण विभाग, बांधकाम विभाग, कृषी विभाग, सामान्य प्रशासन, ग्रामपंचायत विभाग अशा विभागांच्या प्रलंबित कामांची माहिती जठार यांनी जाणून घेतली.
हजारोंना रोजगार देणार
गिर्ये-रामेश्वर या ठिकाणी विजयदुर्ग बंदर होण्यासाठी जागा हस्तांतरित करण्याच्या प्राथमिक प्रक्रियेला शेतकऱ्यांना नोटीस देऊन सुरुवात करण्यात आली आहे. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा औष्णीक प्रकल्प होणार नाही. या ठिकाणी जागतिक दर्जाचे बंदर निर्माण होऊन आयात-निर्यात या ठिकाणावरुन करणार आहे.
ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा राजापूर तालुक्यात नाणार या ठिकाणी होणार आहे. हा प्रकल्प हजारो बेरोजगारांना रोजगार देणारा ठरणार आहे. या ग्रीन रिफायनरी प्रकल्पासाठी आयात व निर्यात विजयदुर्ग बंदरामधून केली जाणार आहे. यामुळेच विजयदुर्ग बंदर विकसित होण्यासाठी गिर्ये-रामेश्वर येथे शासन जमीन हस्तांतरित करणार असल्याची माहिती प्रमोद जठार यांनी दिली. ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा पर्यावरणाचा ऱ्हास करणारा नसून हजारो बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुन येथे आर्थिक सुबत्ता आणणारा प्रकल्प आहे.