कोकम बियांपासून बनविल्या राख्या, मालवण पंचायत समितीचा उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2020 03:17 PM2020-08-03T15:17:13+5:302020-08-03T15:18:37+5:30
निसर्गाचा समतोल राखणे हे आपले कर्तव्य आहे. निसर्ग वाचला तर आपण सर्वजण वाचणार आहोत. याच हेतूने निसर्ग समृद्ध व्हावा, झाडे वाढावीत या उद्देशाने कोकमच्या बी पासून राखी ही संकल्पना राबविली जात आहे, अशी माहिती सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर यांनी दिली.
मालवण : निसर्गाचा समतोल राखणे हे आपले कर्तव्य आहे. निसर्ग वाचला तर आपण सर्वजण वाचणार आहोत. याच हेतूने निसर्ग समृद्ध व्हावा, झाडे वाढावीत या उद्देशाने कोकमच्या बी पासून राखी ही संकल्पना राबविली जात आहे, अशी माहिती सभापती अजिंक्य पाताडे, उपसभापती राजू परुळेकर यांनी दिली.
नेहमीच अभिनव उपक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या मालवण पंचायत समितीने रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने पर्यावरण समृद्ध करण्याच्या उद्देशाने कोकमच्या बी पासून राखी बनविणे हा उपक्रम राबविला आहे. सभापती पाताडे, उपसभापती परुळेकर, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम सत्यात उतरणार आहे. पंचायत समितीमध्ये सर्व सदस्यांच्या उपस्थितीत महिला कर्मचाऱ्यांना या राख्या देऊन या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
कोकमच्या (रतांबा) बिया असलेल्या राख्या पंचायत समिती महिला कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आल्या आहेत. रक्षाबंधनला बांधलेली राखी तुटली तर अथवा काही दिवसांनी काढून आपण टाकून देतो.
मात्र, कोकम बी चिकटवलेली राखी आजूबाजूच्या परिसरात टाकल्यास अथवा योग्य जागी पुरून ठेवल्यास त्यातून कोकमाचे उत्पादन देणारी झाडे त्या परिसरात उगवतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. मालवणातील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी करवंटीपासून इको फ्रेंडली राख्या बनविल्या आहेत.