मृत भावाला केले रक्षाबंधन
By Admin | Published: August 28, 2015 11:54 PM2015-08-28T23:54:31+5:302015-08-28T23:54:31+5:30
परिसरात हळहळ : एडगाव येथील हृदयद्रावक घटना
वैभववाडी : हाडाच्या कॅन्सरने ग्रासलेल्या एडगाव इनामदारवाडी येथील हर्षद रवींद्र रावराणे (वय १६) या दहावीतील विद्यार्थ्याने गेले दीड वर्ष मृत्यूशी दिलेली झुंज व्यर्थ ठरली. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हर्षदने जगाचा निरोप घेतला. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याने त्याच्या पाचवीमध्ये शिकणाऱ्या लहान बहिणीला जबरदस्त मानसिक धक्का बसला. साक्षीने मृत भावाच्या मनगटावर राखी बांधून दादा एक दिवस थांबला असतास तर... असा टाहो फोडत आक्रोश केला. साक्षीच्या आक्रोशाने हर्षदच्या अंत्यविधीला जमलेल्यांचे हृदय पिळवटून गेले.हर्षद कोकिसरे येथील माधवराव पवार विद्यालयात दहावीमध्ये शिकत होता. गेल्या दीड वर्षापूर्वी कॅन्सरमुळे तो आजारी पडला होता. त्याला कॅन्सर झाल्याचे निष्पन्न होताच उपचार सुरू करण्यात आले होते. त्यामुळे हर्षदच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा झाली होती. त्याच्या कुटुंबाची अर्थिक स्थितीही बेताची आहे. यंदा शाळा सुरु झाल्यावर तो काही दिवस नियमित शाळेतही जात होता. मात्र, गेले काही दिवस त्याची तब्येत पुन्हा खालावली होती. त्यामुळे त्याला गुरुवारी उपचारासाठी कोल्हापूरला नेले होते. हर्षदची प्रकृती एकदमच खालावल्याने त्याला गुरुवारी रात्री घरी आणले होते.
दीड वर्ष धीराने मृत्यूशी लढलेल्या हर्षदने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जगाचा निरोप घेत जन्मदात्या आई वडिलांना दुखा:च्या खाईत लोटले. सूर्योदयापूर्वीच हर्षदच्या मृत्यूची बातमी गावात कळली. तसे गाव सुन्न झाले. बहुतेक गावकऱ्यांनी त्याच्या आई वडिलांना धीर देण्यासाठी हर्षदच्या घरी धाव घेतली. हर्षदच्या मृत्यूची माहिती समजताच तालुक्यात लोक हळहळले. पंचक्रोशीतील अनेकांनी हर्षदचे घर गाठले.
शनिवारी रक्षाबंधन असल्याने हर्षदसाठी साक्षीने राखी आणून ठेवली होती. मात्र, बहिण भावाच्या नात्याला धाग्यात गुंफून भाऊरायाला ओवाळणीसाठी आतुरलेल्या साक्षीला रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी भावाचा मृत्यू झाल्याने जबरदस्त धक्का बसला. साक्षीने मृत हर्षदच्या मनगटावर राखी बांधून रक्षाबंधनाचाचे कर्तव्य पार पाडत भावाच्या मृतदेहाला कवटाळून आक्रोश केला. त्यावेळी उपस्थितांना गहिवरून येवून साऱ्यांचे डोळे पाणावले.
हर्षदच्या मृत्यूमुळे माधवराव पवार विद्यालयाला सुट्टी देऊन शाळा व्यवस्थापनाने दुखवटा पाळला. तसेच त्याच्या वर्गातील मित्र मैत्रीणींसह शिक्षकांनी त्याच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांचे सांत्वन केले. हर्षदच्या पश्चात आई, वडील लहान बहिण, चुलते आणि आजी असा परिवार
आहे. (प्रतिनिधी)