रमाई नदीतील गाळ उपसा होणार
By admin | Published: March 25, 2015 10:07 PM2015-03-25T22:07:41+5:302015-03-26T00:10:32+5:30
विनायक राऊत : मसुरेतील पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी मदत
चौके : मालवण तालुक्यातील मसुरे येथील शेतकऱ्यांची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमाई नदीपात्रात साचलेल्या गाळामुळे नदी पूर्णपणे बुजून गेल्याची स्थिती आहे. या नदीच्या पाण्यावर हजारो एकर शेती अवलंबून असून, साचलेला गाळ पावसात पूर परिस्थितीस कारणीभूत ठरतो. तसेच इतर अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेता खासदार विनायक राऊत यांनी मंगळवारी रमाई नदीपात्राची पाहणी करत या नदीपात्रातील गाळ तातडीने उपसा करण्यासाठी अधिकारीवर्गाला सूचना देत अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्या आहेत.या पाहणी दौऱ्यावेळी खासदार विनायक राऊत यांच्यासमवेत शिवसेना कामगार संघटना सरचिटणीस जयवंत परब, जिल्हा परिषद सदस्य संग्राम प्रभुगांवकर, युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षद गावडे, तालुकाप्रमुख बबन शिंदे, विभागप्रमुख राजा कोरगांवकर, सतीश प्रभू यांच्यासह अन्य पदाधिकारी तसेच बंदर विभाग, खारलँडचे अधिकारी उपस्थित होते. नदीपात्रातील गाळ उपशाबाबत जयवंत परब यांनी वारंवार खासदार राऊत यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार ही पाहणी करण्यात आली.डोझरच्या सहाय्याने हा गाळ तत्काळ काढला जावा व गोवा धर्तीवर नदीपात्रात फायबर बंधारे बांधण्यात यावेत असे सुचविले. यावेळी खासदार राऊत यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर गाळ काढण्याची कार्यवाही करावी. आवश्यक ती कागदपत्रे जमा करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. (वार्ताहर)
जिल्हा परिषदेतर्फे दीड कोटीची तरतूद
या नदीपात्रातील गाळ गेली अनेक वर्षे वाढत आहे. वृक्षतोड, नदीवर बांधण्यात येणारे बंधारे तसेच माती व अन्य कारणांनी गाळ वाढत आहे. मात्र, गाळ उपसा करण्याची कार्यवाही झाली नाही. असे असले तरी २०१३ साली जिल्हा परिषदेच्या जिल्हा नियोजन बैठकीत याबाबत दीड कोटीची तरतूद करत गाळ उपशासाठी तत्वत: मंजुरी देण्यात आली आहे.
- संग्राम प्रभुगावकर
जिल्हा परिषद सदस्य, मसुरे