रामेश्वर देवस्वारीचे मालवण बाजारपेठ येथे उत्स्फूर्त स्वागत, देवतांचा त्रैवार्षिक भेट सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 10:06 PM2023-02-11T22:06:19+5:302023-02-11T22:06:57+5:30
या ऐतिहासिक भेटीनंतर शनिवारी दुपारी मालवण बाजारपेठ येथे देव स्वारीचे आगमन झाले.
- संदीप बोडवे
मालवण : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया भवानी माता व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ऐतिहासिक, पारंपारिक, त्रैवार्षिक भेट सोहळा शुक्रवारी दिमाखात साजरा झाला. यानिमित्ताने परंपरेप्रमाणे कांदळगाव (मालवण) चे ग्रामदैवत स्वयंभू देव रामेश्वर आपले वारे सूत्र, तरंग, व रायतेसह किल्ले सिंधुदुर्ग येथे देवतांच्या भेटीसाठी आले होते.
या ऐतिहासिक भेटीनंतर शनिवारी दुपारी मालवण बाजारपेठ येथे देव स्वारीचे आगमन झाले. यावेळी मालवण व्यापारी संघ आणि शहरातील भाविकांनी देवस्वारीचे भक्तिमय वातावरणात स्वागत केले. रामेश्वर मांड येथे पालखी भाविकांच्या दर्शनासाठी थांबली होती. यावेळी भाविकांची गर्दी उसळली. दरम्यान, याठिकाणी भाविकांसाठी महाप्रसाद ठेवण्यात आला होता. महाप्रसाद झाल्यानंतर सायंकाळी देवस्वारीचा परतीचा प्रवास करत श्री देव रामेश्वर आपल्या राउळात विराजमान होणार आहेत.
सिंधुदुर्ग किल्ल्यावर देवतांच्या भेटीचा सोहळा पार पडल्यानंतर देवस्वारीचे रात्रौ मेढा येथील श्री मौनीनाथ मंदिरात आगमन झाले होते. सकाळी कुशेवाड्यात पालखीने भेट दिल्यानंतर दुपारी वाजत गाजत पालखी शहरातील रामेश्वर मांडाच्या दिशेने रवाना झाली. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास या पालखीचे रामेश्वर मांडावर आगमन झाले. याठिकाणी व्यापारी वर्गाने पालखीचे स्वागत केले. एकूणच मोठ्या संख्येने भाविक या सोहळ्यात सहभागी झाले होते.