रामेश्वर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा
By admin | Published: February 18, 2015 12:46 AM2015-02-18T00:46:05+5:302015-02-18T00:46:05+5:30
विजयदुर्ग येथील यात्रा : देवस्थान कमिटीच्यावतीने चोख व्यवस्था
पुरळ : विजयदुर्ग येथील रामेश्वर यात्रेला महाशिवरात्रीच्या निमित्ताने सकाळपासूनच रामेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. देवगड तालुक्यातील रामेश्वरभक्तांनी या यात्रेला मोठी उपस्थिती लावली होती. रामेश्वराच्या पिंडीवर अभिषेक तसेच नवस बोलणे, नवस फेडणे आदी धार्मिक कार्यक्रमांना सकाळपासूनच मंदिरामध्ये सुरुवात झाली.
रामेश्वर दर्शनासाठी आलेल्या भक्तांना व्यवस्थित दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी देवस्थान कमिटीच्यावतीने व्यवस्था करण्यात आली होती. रामेश्वरवाडी येथील युवा संघाच्यावतीने व्यवस्थित रांगा लावून भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठीही विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गंभीर व पोलीस स्टाफ तसेच तंटामुक्ती समित्यांचे अध्यक्ष, पोलीस पाटील, रामेश्वर मंदिराची उत्सव समिती कार्यरत होती. प्रसिद्ध मालवणी खाजा, कलिंगड, भाजीपाला, निरनिराळ्या प्रकारची खेळणी, हॉटेल्स, कोल्ड्रींक्स आदींनी ही यात्रा भरलेली दिसून आली. सायंकाळी सहानंतर गर्दीचा ओघ वाढला. रात्री उशिरा रामेश्वरची पालखी निघेपर्यंत यात्रेकरूंची गर्दी दिसून आली. कोटकामते येथील श्री देवी भगवती दशावतारी नाट्यमंडळाने यात्रेच्या पहिल्या दिवसापासून या मंदिरात धार्मिक तमाशाचे खेळ चालू केले आहेत. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम होत असल्याने या जीर्णोद्धारासाठी भाविकांनी सढळ हस्ते मदत करण्याचे आवाहन जीर्णोद्धार समितीने केले आहे. बुधवारी यंदाच्या यात्रोत्सवातील शेवटचा दिवस असल्याने यात्रेकरू मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा विश्वास देवस्थान समितीने व्यक्त केला आहे. (वार्ताहर)