रामगड हायस्कूल राज्यात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2016 10:44 PM2016-02-05T22:44:26+5:302016-02-05T23:58:04+5:30
विज्ञान प्रदर्शनात मारली बाजी : भंडारी हायस्कूलला उत्तेजनार्थ व्दितीय पारितोषिक
ओरोस : प्राथमिक व माध्यमिक विभागाच्यावतीने बारामती विद्यापीठ येथे ३१ जानेवारी ते ४ फेबुवारी या कालावधीत पार पडलेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटातून मालवण तालुक्यातील प्रगत विद्यामंदिर रामगड विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अष्टपैलू कृषीयंत्र या मॉडेलला प्रथम क्रमांक मिळाला आहे.
तसेच राज्यभरातून सादर झालेल्या ४५७ प्रतिकृतीमध्ये गटवार करण्यात आलेल्या परिक्षणात रामगड विद्यालयाने चॅम्पियनशीप पटकाविली आहे. तसेच भंडारी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय उत्तेजनार्थ बक्षीस मिळविले आहे. एकंदरीत या प्रदर्शनात सिंधुदुर्ग जिल्ह्याने वर्चस्व राखले आहे.
तालुका व जिल्हास्तरावरील प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे विज्ञान प्रदर्शन झाल्यानंतर बारामती येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्शनात माध्यमिक गटातून १२७ प्रतिकृती सादर झाल्या होत्या. तर प्राथमिक व माध्यमिक गट विद्यार्थी, शिक्षक यांचे मिळून एकूण ४५७ प्रतिकृती सादर केल्या होत्या. याचे परीक्षण करून गुरुवारी निकाल जाहिर करण्यात आला. या निकालात सिंधुदुर्गने बाजी मारली आहे. या विद्यार्थ्यांना माजी तंत्र व शिक्षणमंत्री राजेश टोपे, सुनेत्राताई पवार, नागपूर शिक्षण परिषद संचालक साळुंखे यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले.
यासाठी मुख्याध्यापक ए. आर. पोर्लेकर व शिक्षक महादेव पवार यांचे मार्गदर्शन लाभले. यात एकूण अकरा उपकरणे बसविण्यात आली आहेत. शहाळ्याला भोक पाडणे, शहाळे व सुका नारळ सोलणे, खोबरे किसणे, ज्यूस काढणे, भाजी कटर, काजू कटर, चाळण, नांगरणी, बी पेरणी, किटकनाशक फवारणी, कोळपणी यंत्र असे विविध प्रकार आहेत.
माध्यमिक गटात राज्यात प्रथम प्रतिकृती आलेल्या प्रगत विद्यामंदिर रामगड या प्रशालेने या राज्यस्तरीय स्पर्धेत आपली छाप पाडली आहे.
भंडारी हायस्कूल मालवणच्या ऋतुजा तुकाराम येवले या विद्यार्थिनीने प्राथमिक गटातून सादर केलेल्या तुषार सिंचन व निर्वात पंप या प्रतिकृतीला उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक मिळालेला आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षक एच. बी. तिवले, संदीप अवसरे, महेश सामंत, प्राची प्रभू या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. (वार्ताहर)
अष्टपैलू कृषीयंत्र मॉडेल : तीन विद्यार्थी चमकले
बारामती विद्यापीठात विज्ञान प्रदर्शनात मालवण तालुक्यातील प्रगत विद्यामंदिर रामगडच्या दहावीची विद्यार्थिनी गौरी मेस्त्री, नववीचे शुभदा मठकर, विकास लिंगायत या विद्यार्थ्यांनी अष्टपैलू कृषीयंत्र बनविले
आहे.