कणकवलीत भावपूर्ण वातावरणात रामजन्म उत्सव
By Admin | Published: April 4, 2017 04:36 PM2017-04-04T16:36:31+5:302017-04-04T16:51:07+5:30
राम जन्मला ग सये, राम जन्मला" असे पाळणा गीत म्हणत मोठ्या आनंदात परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या परिसरातील श्री काशीविश्वेश्वर मंदिरात मंगळवारी भावपूर्ण
>ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. 04 - "राम जन्मला ग सये, राम जन्मला" असे पाळणा गीत म्हणत मोठ्या आनंदात परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या परिसरातील श्री काशीविश्वेश्वर मंदिरात मंगळवारी भावपूर्ण वातावरणात श्रीराम जन्म सोहळा पार पडला. राम नामाच्या गजराने येथील परिसर दुमदुमून गेला होता.
श्रीराम नवमी उत्सवाच्या निमित्ताने सोमवारपासूनच परमहंस भालचंद्र महाराज संस्थान परिसरात भाविकांची लगबग सुरु होती. श्रीराम जन्माची तयारी करण्यात आली होती. दरवर्षी प्रमाणेच मंगळवारी सकाळी श्री काशीविश्वेश्वर मंदिरात काही धार्मिक विधी पार पडले. त्यानंतर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास कीर्तनाला प्रारंभ झाला. श्रीरामाची महती वर्णन करत कीर्तनकारानी राम जन्माची कथा सांगितली. दुपारी 12 वाजता कीर्तनाच्या माध्यमातून राम जन्म झाला. त्यानंतर श्रीरामाच्या बाल मूर्तिला पाळण्यात घालून झोके देण्यात आले. तसेच, पारंपारिक पाळणा गितेही म्हणण्यात आली. भाविकांनी श्रीराम मुर्तीचे दर्शन घेतले. त्यांना प्रसाद वाटप करण्यात आले.
हा श्रीराम जन्माचा सोहळा प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. या सोहळ्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.