कणकवलीत राणेंच्या ‘स्वाभिमान’चा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:05 AM2018-04-13T00:05:56+5:302018-04-13T00:05:56+5:30
कणकवली : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निकालात माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी बाजी मारली आहे. स्वाभिमान पक्ष आणि राष्ट्रवादी आघाडीने थेट नगराध्यक्ष व १७ पैकी ११ जागा जिंकून स्वाभिमानचा झेंडा नगरपंचायतीवर फडकविला आहे. प्रतिष्ठेच्या बनलेल्या निवडणुकीत नारायण राणे यांनी एकहाती विजय मिळवून विरोधकांना धूळ चारली आहे.
‘स्वाभिमान’च्या समीर नलावडे यांनी भाजप-शिवसेना युतीच्या संदेश पारकर यांचा अतिशय अटीतटीच्या लढाईत अवघ्या ३७ मतांनी पराभव करीत यश प्राप्त केले. शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी तीन जागांवर समाधान मानावे लागले. स्वतंत्रपणे लढणाऱ्या राष्ट्रीय काँग्रेस व कणकवली विकास आघाडीला या निवडणुकीत आपले खाते खोलता आलेले नाही. मात्र, स्वाभिमानशी आघाडी केल्याने राष्ट्रवादीला अबिद नाईक यांच्या रूपाने एक जागा मिळाली आहे. पक्ष स्थापनेनंतर पहिलीच निवडणूक लढविणाºया महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला रोखण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने युती केली होती. त्यातच नारायण राणे व त्यांचे सुपुत्र आमदार नीतेश राणे यांच्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते.
नगरपंचायतीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे प्राबल्य!
कणकवली नगरपंचायत निवडणूक निकालानंतर नगरपंचायतीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचेच प्राबल्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक पक्ष असलेल्या भाजपला तीन, शिवसेनेला तीन, तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला नगरसेवक पदाच्या १० जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत स्वाभिमान पक्षाच्या साथीने राष्ट्रवादी काँग्रेसने १ जागा मिळविली आहे, तर काँग्रेस व कणकवली विकास आघाडीला एकही जागा मिळविता आलेली नाही.
जनतेचा कौल मान्य : संदेश पारकर
कणकवली नगरपंचायतीसाठी अटीतटीची लढाई झाली. आमचे उमेदवार अगदी थोड्या मतांनी पराभूत झाले. जनतेचा कौल आपल्याला मान्य आहे. येत्या पाच वर्षांत आणखीन काम करून पुढील निवडणुकीत यश मिळविण्यासाठी प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया संदेश पारकर यांनी यावेळी दिली.
समीर नलावडे नगराध्यक्ष!
कणकवली नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीत समीर नलावडे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष) विजयी झाले आहेत. त्यांना ४०९४ मते मिळाली आहेत. संदेश पारकर (भाजप) यांना ४०५७ मते, राकेश राणे (कणकवली विकास आघाडी) यांना ११४९ मते, विलास कोरगावकर (काँग्रेस) यांना २८० मते मिळाली आहेत, तर ७८ जणांनी नोटाचा वापर केला आहे.