बाळासाहेबांमुळेच राणे, भुजबळ मंत्री झाले
By admin | Published: July 7, 2016 12:02 AM2016-07-07T00:02:30+5:302016-07-07T00:40:42+5:30
वैभव नाईक यांचा घणाघात : माणगाव खोऱ्यातील टाळंबा, आकारीपड प्रश्न सोडविण्यासाठी सेना कटीबद्ध
माणगाव : राणे, भुजबळ यांच्यासारखे नेते आमदार, खासदार, मंत्री झाले ते केवळ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच. सर्वसामान्यांना संधी देणारा हा पक्ष आहे. सेनेची जनसामान्यांच्या जीवावरच पुढची घौडदौड सुरू आहे. माणगाव खोऱ्यातील टाळंबा व आकारीपड प्रश्न सोडविण्यातही सेना कटीबद्ध असून आगामी विधानसभेवर भगवा फडकवून सेनेचाच मुख्यमंत्री करण्यासाठी सर्वांनी सज्ज रहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांनी माणगाव येथील शिवबंधन मेळाव्यात केले.
शिवसेनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आमदार वैभव नाईक यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात सुरू असलेल्या शिवबंधन पंधरवडा कार्यक्रमांतर्गत बुधवारी माणगाव विभागाचा मेळावा माणगाव तिठा येथील हॉलमध्ये पार पडला. संपर्कप्रमुख गौरीशंकर खोत यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार नाईक, विधानसभा संपर्कप्रमुख सुरेश पाटील, कुडाळ तालुका संपर्कप्रमुख बाळा म्हाडगुत, नागेंद्र परब, उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, तालुकाप्रमुख राजन नाईक, एसटी सेना जिल्हाध्यक्ष संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत, उपजिहाप्रमुख वर्षा कुडाळकर, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, नगरसेवक सचिन काळप, गणेश भोगटे, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत तामाणेकर, बंड्या कुडतरकर, आपा मुंज आदींसह शिवसेना, युवा सेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले, राणे, भुजबळ, गणेश नाईक हे जरी सेना सोडून गेले असले, तरीही पक्षावर कसलाच परिणाम झाला नाही. राज्यासह केंद्रातील सत्तेचा उपयोग करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पालकमंत्री केसरकर, खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक प्रकल्प राबविले जात आहेत. वीज समस्यांबाबत ८३ कोटींचा निधी जिल्ह्याला उपलब्ध झाला आहे. तसेच मळगाव, कुडाळ या रेल्वेस्थानकांची सुधारणा, जिल्ह्यातील रस्त्यांकडून उपेक्षित असणाऱ्या वाड्यावस्त्यांना विविध खात्यांच्या निधीतून रस्ते निर्माण करण्याचा शिवसेनेचा ध्यास असून, आगामी काळात जिल्ह्यातील जनतेला मूलभूत सोयीसुविधा पुरविण्याचे आश्वासन नाईक यांनी दिले.
यावेळी संपर्कप्रमुख गौरीशंकर खोत म्हणाले, घराणेशाहीच्या नावावर राणे यांनी शिवसेना सोडली आणि त्याचा परिपाक म्हणून स्वत:ची घराणेशाही जिल्ह्यावर लादली. आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पावधीतच जिल्हा भगवामय झाल्याने विरोधकांच्यात धडकी भरली असून आगामी निवडणुकांत त्याची प्रचितीहीे येईल. यावेळी संजय पडते, अभय शिरसाट यांनीही आपल्या मनोगतातून शिवसेनेच्या कार्याचा आढावा घेतला आणि आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले. मेळाव्यापूर्वी शिवसेनेच्या वाटचालीची चित्रफित दाखविण्यात आली. (प्रतिनिधी)
सेना नऊही जागा जिंकेल : संजय पडते यांचा विश्वास
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत कुडाळ तालुक्यातील नऊही जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे निवडून येतील, त्यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन यावेळी संजय पडते यांनी केले. तर जिल्हा परिषदेवर भगवा फडकवा, असे आवाहन शिवसेना महिला जिल्हाप्रमुख जान्हवी सावंत यांनी केले. जिल्हा परिषदेत आज विरोधकांना बसायला जागा नाही आहे. अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना निर्विवाद यश मिळविल, असा आशावाद यावेळी उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट यांनी व्यक्त केला.