वैभववाडीचे प्रश्न सोडविण्यात राणे, जठार अपयशी
By admin | Published: October 23, 2015 09:40 PM2015-10-23T21:40:54+5:302015-10-24T00:41:07+5:30
शैलेश भोगले : काँग्रेस आणि महायुतीला मते मागण्याचा अधिकार नाही
वैभववाडी : वाभवे-वैभववाडीच्या पायाभूत समस्या सोडविण्यात काँग्रेसचे आमदार नीतेश राणे तसेच माजी आमदार प्रमोद जठार सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीत त्यांना मते मागण्याचा नैतिक अधिकार नाही. असे मत मनसे जिल्हाध्यक्ष शैलेश भोगले यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
येथील मनसे कार्यालयात सायंकाळी पत्रकार परिषद झाली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग नाईक, तालुकाध्यक्ष सचिन तावडे, महिला जिल्हाध्यक्षा भारती रावराणे, जिल्हा चिटणीस अशोक रावराणे आदी उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, वाभवे-वैभववाडी ग्रामपंचायतीत आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. मात्र सत्तेवर असताना ही मंडळी विकास करू शकली नाहीत.
भोगले म्हणाले म्हणाले की, वैभववाडीचा पाणी प्रश्नही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सत्ताधारी सोडवू शकले नाहीत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना आमदार नीतेश राणे या प्रश्नासाठी वर्षभरात एकदाही फिरकले नाहीत. माजी आमदार जठार यांनी पाच वर्षात फक्त घोषणाच केल्या. आता सत्ता असूनसुद्धा ते काही करू शकले नाहीत. आमदार नीतेश राणे आणि प्रमोद जठार वैभववाडीच्या प्रश्नांवर सपशेल अपयशी ठरले आहेत. तेच आता मते मागत घरोघरी फिरत आहेत.
ते पुढे म्हणाले, आमदार असताना जठार यांनी एस. टी. स्थानकाचा मुद्दा उचलून धरला होता. मात्र, सत्ता आल्यावर हा प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. आमदार नीतेश राणे हेही या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत. भाजी, मासळी, मटण मार्केट रस्त्यावर आहे. याबाबत सत्ताधारी आणि आमदार काहीच करू शकलेले नाहीत. त्यामुळे आम्ही एकाच प्रभागात उमेदवार देऊन तो निवडून आणण्याचा प्रयत्न करत आहोत. मनसेचा उमेदवार निवडून आल्यावर नगरपंचायतीत दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी वचक ठेवण्याचे काम करेल, असा विश्वास भोगले यांनी व्यक्त
केला. (प्रतिनिधी)
पुढच्या गप्पा काय उपयोगाच्या?
एस. टी. स्थानकाच्या प्रश्नात आमदार नीतेश राणे काहीच करू न शकल्याच्या आरोपावर आमदार राणे यांच्या मागणीवरून खासदार भालचंद्र मुणगेकर यांनी बसस्थानकासाठी २५ लाख देण्याची घोषणा केल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले असता बसस्थानकासाठी जागेचा प्रश्न महत्वाचा आहे. जागेचाच मूळ प्रश्न सुटत नसेल तर पुढच्या गप्पा काय उपयोगाच्या? असा सवाल शैलेश भोगले यांनी केला.