पालकमंत्र्यांमुळे जिल्ह्याच्या विकासाला खीळ : राणे

By admin | Published: August 18, 2015 12:38 AM2015-08-18T00:38:46+5:302015-08-18T00:39:36+5:30

मेळाव्यात टीका : पाचशे कोटींतील तीनशे कोटी मागील सरकारचे

Rane has bothered about development of the district due to Guardian Minister: Rane | पालकमंत्र्यांमुळे जिल्ह्याच्या विकासाला खीळ : राणे

पालकमंत्र्यांमुळे जिल्ह्याच्या विकासाला खीळ : राणे

Next

सावंतवाडी : पाचशे कोटींचा हिशेब सांगणाऱ्या पालकमंत्री केसरकर यांनी तीनशे कोटी मागील सरकारने दिले आहेत, याचे भान ठेवावे. या पालकमंत्र्यांमुळे जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसली असून साखर, गूळ देऊन लोकांना लाचार बनविण्यापेक्षा सक्षम बनवा, अशी टीका माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पालकमंत्र्यांवर केली. ते सावंतवाडी येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.
या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, तालुकाध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, डॉ. जयेंद्र परुळेकर, संदीप कुडतरकर, महिला जिल्हाध्यक्षा प्रणिता पाताडे, सभापती प्रमोद सावंत, प्रमोद कामत, पंढरी राऊळ, अन्वर खान, शहर अध्यक्ष मंदार नार्वेकर, अ‍ॅड. दिलीप नार्वेकर, युवक जिल्हाध्यक्ष आनंद शिरवलकर, शिक्षण सभापती गुरू पेडणेकर, दिलीप भालेकर, प्रमोद गावडे, रवींद्र मडगावकर, माजी सभापती प्रियंका गावडे, आदी यावेळी उपस्थित होते.
नारायण राणे म्हणाले, अच्छे दिन म्हणणाऱ्यांनी येथील जनतेला बुरे दिन दाखविण्यास सुरुवात केली आहे. अनेक आश्वासनांना आपण भुलून त्यांना मते दिली, पण आता काय वाट्याला आले ते प्रत्येकाने बघावे. राज्याचे मुख्यमंत्री तर हे करू आणि ते करू सांगतात. त्यांना निधीचे नियोजन कसे करावे, हे माहीत नाही. हे राज्यातील सरकार जास्त दिवस टिकेल असे वाटत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
विद्यमान पालकमंत्र्यांना विधानसभेत बोलता येत नाही. निधी कोण देतो हे माहीत नाही. ते ५०० कोटींचा हिशेब सांगत आहेत. त्यातील चिपी विमानतळाचे काम यापूर्वी खासगी कंपनीला काँग्रेसच्या काळात ‘बांधा वापरा व हस्तांतर करा’ या तत्त्वावर दिले आहे, तर पर्यटनासाठी आलेले शंभर कोटी केंद्र सरकारने काँग्रेसच्या काळातच दिले आहेत. तीनशे कोटींचा निधी हा मागील सरकारचा आहे. उर्वरित दोनशे कोटी हे पालकमंत्र्यांचे कर्तृत्व नसून हा निधी प्रत्येक सरकारकडून बांधकाम तसेच अन्य कामासाठी येतच असतो. निवडणुकीत साखर, गूळ देऊन लोकांना लाचार बनविण्यापेक्षा त्यांना सक्षम बनवा, असा सल्लाही यावेळी राणे यांनी दिला आहे.
मी काय केले म्हणणाऱ्यांनी सी-वर्ल्ड, उत्तम स्टील कंपनी, विमानतळ, रेडी बंदर कोणी आणले ते सांगावे, असे आव्हान यावेळी राणे यांनी दिले. कार्यकर्त्यांनी पराभवाच्या छायेतून बाहेर येऊन काम करावे. तालुकाध्यक्ष म्हणून नेमणूक केल्यानंतर संजू परब यांनी विश्वास सार्थ केला, असे राणे म्हणाले.
जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी पालकमंत्री, भाजप व शिवसेनेवर जोरदार टीका केली. या मेळाव्यात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
काँग्रेसमधून गेले ते लोंबकळत राहिले : अ‍ॅड. नार्वेकर
काँग्रेस पक्ष सोडला त्यांची अवस्था बघा. काँग्रेस हा महासागर असून पक्ष विकासातून घडतो व निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बळावर उभा असतो, असे सांगत अ‍ॅड. नार्वेकर यांनी काँग्रेसमधून गेलेले सध्या लोंबकळत असल्याची टीका केली.
 

Web Title: Rane has bothered about development of the district due to Guardian Minister: Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.