Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे राणे सुधारतील : केसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 11:43 AM2019-10-18T11:43:13+5:302019-10-18T11:45:11+5:30
मुख्यमंत्र्यांनी आमच्या पक्षात आल्यानंतर राणे सुधारतील असे सांगितल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवूया, असे राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
सावंतवाडी : राजन तेली यांनी पूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केले आहे. त्यामुळेच माझ्या पराभवासाठी तेलींना राणेंनी उमेदवारी दिली आहे. माझे राणेंशी व्यक्तिगत भांडण नव्हते. त्यांच्या विचारधारेशी माझा लढा आहे.
मुख्यमंत्र्यांनी आमच्या पक्षात आल्यानंतर राणे सुधारतील असे सांगितल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवूया, असे राज्याचे गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी डॉ. जयेंद्र परूळेकर, शब्बीर मणियार, उमाकांत वारंग, अशोक दळवी उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले, तेली हे सावंतवाडीच्या कारागृहात सहा महिने होते. कारागृहात ठेवलेली व्यक्ती समाजसुधारक म्हणून येत नसते. त्यांनी काहीतरी गुन्हा केला म्हणूनच आलेली असते. त्यामुळेच कदाचित त्यांना सावंतवाडी आवडत असावी, असा टोलाही केसरकर यांनी लगावला.
माझ्या विरोधात राणे यांनीच तेली यांना पाठविले आहे. त्यांच्या प्रचारासाठीही राणे येतात. यापूर्वी राणे आणि तेली हे जिल्ह्यात समीकरण होते. आता ते पुन्हा सुरू होईल. त्यामुळे जनतेने यातून योग्य तो बोध घ्यावा, असेही केसरकर म्हणाले.