राणेंना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचंय!
By admin | Published: January 3, 2017 11:19 PM2017-01-03T23:19:46+5:302017-01-03T23:19:46+5:30
विद्यार्थ्यांसमोर इच्छा व्यक्त : सावंतवाडीत स्पर्धा परीक्षेबाबत केले मार्गदर्शन
सावंतवाडी : मी घरात शिवराज्याभिषेकाचे छायाचित्र लावले आहे. त्यातून मला प्रेरणा मिळते. राज्याच्या राजकारणातील सर्व महत्त्वाची पदे भूषविली असली, तरी मला पुन्हा मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. ती कधीही दडवून ठेवली नाही. माणसाने महत्त्वाकांक्षी असलेच पाहिजे, असे उद्गार महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा आमदार नारायण राणे यांनी काढले.
ते सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या शासन अंगीकृत स्पर्धा परीक्षांबाबत मार्गदर्शन शिबिरात मंगळवारी बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी आर. के. जोशी, शिक्षण सभापती आत्माराम पालेकर, सेवा दलाचे अध्यक्ष गुरुनाथ पेडणेकर, विकास सावंत, सभापती प्रमोद सावंत, तालुकाध्यक्ष संजू परब, रणजित देसाई, शिक्षणाधिकारी रंगराव काळे, गजानन गणबावले, नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर, राजू बेग, गटविकास अधिकारी मोहन भोई, शिवाजीराव देसाई, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक डी. ए. सरडे, संपत गायकवाड, आदी उपस्थित होते.
नारायण राणे म्हणाले, मी गेली ३१ वर्षे राज्याच्या राजकारणात आहे. नगरसेवकापासून ते मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेतेपद भूषविले आहे. त्यामुळे राज्यातील सर्व अधिकाऱ्यांशी माझे जवळचे संबंध आहेत आणि ते मी कायम टिकवून ठेवले आहेत. प्रत्येक अधिकारी हा मेहनतीने पुढे जात असतो. यूपीएसीमध्ये महाराष्ट्राचा टक्का फारच कमी आहे, पण बिहार, केरळ, तमिळनाडू या उत्तरेकडील राज्यांतून मोठ्या प्रमाणात आयएएस व आयपीएस होऊन विद्यार्थी महाराष्ट्रात अधिकारी म्हणून येतात. असे विद्यार्थी सिंधुदुर्गमधून देशात कधी पहायला मिळणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सिंधुदुर्ग जिल्हा पूर्वी शैक्षणिक टक्केवारीत मागे होता, पण आता तो झपाट्याने पुढे जात आहे. त्यासाठी नारायण राणेंसारखे द्रष्टे नेते लाभले आहेत. ते नेहमीच मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत असतात, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर यांनी केले.
गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील शैक्षणिक टक्केवारी पाहता आगामी काळात येथील विद्यार्थी आयपीएस, आयएएस या स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करतील, असा आशावाद शिक्षण सभापती आत्माराम पालेकर यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा बँकेचेअध्यक्ष सतीश सावंत यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी संग्राम प्रभुगावकर, प्रमोद सावंत, आत्माराम पालेकर यांनी नारायण राणेंचा पुष्पहार घालून सत्कार केला. कार्यक्रमाला जिल्ह्यातील बहुतांशी शाळेची मुले उपस्थित होती. (प्रतिनिधी)