राजकीय नैराश्यामुळे राणेंची टीका
By admin | Published: August 19, 2015 10:54 PM2015-08-19T22:54:34+5:302015-08-19T22:54:34+5:30
वैभव नाईक : रेडी पोर्टची चौकशी लावल्यामुळे राणेंचा तळतळाट
कुडाळ : मुख्यमंत्र्यांनी रेडी पोर्टची चौकशी लावल्यामुळेच नारायण राणे यांचा तळतळाट होत असून, केवळ नैराश्यापोटी सरकार, माझ्यावर व पालकमंत्र्यांवर आरोप करीत असल्याचा टोला आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांना पत्रकार परिषदेत बोलताना लगावला. जनता सांगेल तेव्हा निवडणूक लढविणार, असे म्हणणाऱ्या राणेंनी बांद्राची निवडणूक का लढविली, असा सवालही त्यांनी यावेळी केला.काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी युती शासनासह आमदार वैभव नाईक, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली होती. नारायण राणे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्याकरिता आमदार नाईक यांनी येथील शिवसेना कार्यालयात बुधवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी उपजिल्हाप्रमुख अभय शिरसाट, युवा सेना जिल्हाप्रुख मंदार शिरसाट, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार नाईक म्हणाले, रेडी पोर्टची चौकशी मुख्यमंत्र्यांनी लावल्यामुळे राणेंचा तळतळाट होत आहे. तसेच ते बांद्रात पराभूत झाले. आता ते माजी मुख्यमंत्र्यांपासून माजी आमदार झाले आहेत. अशाप्रकारे त्यांच्या कारकिर्दीला आता उतरती कळा लागली आहे. त्यामुळे नैराश्येपोटी आमच्या सरकारावर, पालकमंत्र्यांवर आणि माझ्यावर ते आरोप करीत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. आमच्या सरकार स्थापनेच्या दहा महिन्यांच्या कालावधीत मी नगरपंचायत, कुडाळ रेल्वेस्थानकाच्या नूतनीकरण, सोनवडे-घोटगे घाटाची मान्यता, ओरोस एसटी स्थानकासाठी प्रस्ताव केला आहे. याशिवाय एमआयडीसी येथे बंधारा नूतनीकरणासाठी पाच कोटीचा प्रस्ताव पाटबंधारे विभागाला सादर केला. खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून हत्ती प्रश्न सोडविला. तसेच कुडाळ मच्छिमार्केटचे लवकरच भूमीपूजन होणार आहे. कुडाळ ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी पदे भरली. तेथे ब्लड बँक बनविण्यासाठी विचार आहे. युती शासन स्थापन झाल्यावर येथील अधिस्थगन व वाळूबंदी प्रश्न आम्ही महिन्यात सोडविले. पर्यटन अंतर्गत शंभर कोटीचा आराखडा आपणच मंजूर केला, असे म्हणून राणे दिशाभूल करीत आहेत. कारण हा निधी आम्हीच मंजूर केला आहे. कालच यासंदर्भात केंद्रीय पर्यटन समिती याठिकाणी पाहणी करून गेली. (प्रतिनिधी)
राणेंच्या मुलांपेक्षा जास्त बोललो..!
मला अबोल म्हणणाऱ्या राणेंच्या मुलांपेक्षा विधीमंडळात नक्कीच जास्त बोललो आहे. १५० नवीन आमदार आहेत. यापैकी विकासात्मकदृष्ट्या बोलणाऱ्यांमध्ये पहिल्या दहांमध्ये माझा समावेश असून, तसे प्रोसेडींग असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.