राणेचं ट्विट, शिवसेनेचा इशारा, आता अप्पर पोलीस महासंचालक कणकवलीत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2021 05:03 PM2021-12-27T17:03:37+5:302021-12-27T17:05:23+5:30
उलट सुलट चर्चाना उधान; कडक पोलीस बंदोबस्त
सिंधुदुर्ग/कणकवली : राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल आणि कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे सोमवारी सकाळी कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाला भेट दिली. त्यामुळे नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चाना उधाण आले होते.
सध्या जिल्हा बँक निवडणुकीत जोरदार राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच संतोष परब हल्लाप्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंना अटक करण्याचा डाव महाविकास आघाडीचे नेते करत असल्याचा आरोप केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केला आहे. तर, आमदार नितेश राणे यानीही संतोष परब हल्ला प्रकरणात मला नाहक गोवण्याचा डाव सुरू असल्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी संतोष परब हल्ला प्रकरणी नितेश राणे व संदेश उर्फ गोट्या सावंत याना अटक न केल्यास जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर शिवसेना मोर्चा काढणार असल्याचा इशारा दिला आहे.
या पार्श्वभूमीवर खुद्द अप्पर पोलीस महासंचालक कणकवलीत दाखल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, अप्पर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल हे प्रतिवर्षी डिसेंबर अखेर होणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी कणकवलीत दाखल झाले असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सोमवारी सकाळी लवकर उपविभागीय पोलीस कार्यालयात दाखल होत त्यांनी माहिती घेत वार्षिक तपासणी सुरू केली. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांना भेट दिली. दरम्यान, रायगड तसेच इतर जिल्ह्यातून कणकवलीमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस पथके दाखल झाली आहेत. तसेच अधिकारी, दंगल नियंत्रण पथकेही कणकवलीत असल्याने वातावरण काहीसे तणावपूर्ण बनले आहे.
तपास सुरू !
कणकवली येथे झालेल्या संतोष परब हल्ल्याप्रकरणी पोलीस अजूनही गुप्तता पाळत असून जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सोमवरीही प्रसिद्धी माध्यमांना संबधित गुन्ह्याचा तपास सुरू आहे. सहा आरोपीना अटक केली आहे. एवढीच माहिती दिली. इतर माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.