सिंधुदुर्गातील रंगीत तालीम आली अंगलट, आपत्ती व्यवस्थापनांची होणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 11:46 PM2018-01-12T23:46:51+5:302018-01-12T23:47:41+5:30
आपत्ती व्यवस्थापन विभागाने सिंधुदुर्गात जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेली स्फोटांची रंगीत तालीम आपत्ती व्यवस्थापनाच्या अंगलट आली आहे.
सावंतवाडी : आपत्ती व्यवस्थापन विभागाने सिंधुदुर्गात जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेली स्फोटांची रंगीत तालीम आपत्ती व्यवस्थापनाच्या अंगलट आली आहे. या रंगीत तालमीमुळे जिल्हाधिकारी कार्यालयात आलेले अनेक जण घाबरून पळताना जखमी झाले. त्यामुळे ही रंगती तालीम प्रशासनाच्या चांगलीच अंगलट आली आहे. आता या सर्व प्रकारांची कोकण आयुक्तांमार्फत चौकशी होणार आहे. तसे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.
गुरुवारी सिंधुदुर्गनगरीतील जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनाकडून रंगीत तालीम घेऊन अधिकारी तसेच संबधित यंत्रणा किती सजग आहेत. यांची चाचणी घेण्याचे ठरवण्यात आले होते. यांची माहिती कोणालाच नव्हती. ठरल्याप्रमाणे आपत्ती व्यवस्थापनाने ही रंगती तालीम घेतली. मात्र यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक वृद्ध दिव्यांग तसेच गरोदर माता आल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयात स्फोट झाला हे कळाल्याने हे सर्वजण पळून जाऊ लागले. त्यात अनेक जण खाली कोसळले. सगळीकडेच धावाधाव झाली आणि कोणालाच काही समजले नाही.
हा सर्व प्रकार सुरू असतानाच कुडाळ तालुक्यातील सरबळ येथील एकनाथ कदम हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यांनाही यांचा त्रास सहन करावा लागला, ते सध्या जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रंगीत तालीम एखाद्याच्या जिवावर बेतू शकते, यांची दखल पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतली आहे. मॉकड्रील हे जर कोणाच्या आयुष्यावर बेतणारे असेल तर ते योग्य नाही. या संपूर्ण प्रकरणाची कोकण आयुक्तांमार्फत चौकशी करण्यात येणार आयुक्त जिल्ह्यात येऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतील व आपला अहवाल देतील, नंतरच दोषी असतील तर कारवाई करू, मॉकड्रील असे असू नये, असे मत ही त्यांनी यावेळी मांडले.